नदी स्वच्छ, पवित्र, प्रवाही ठेवा - शंकराचार्य विद्यानृसिंह भारती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

कोल्हापूर - धर्मामध्ये नदीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यासाठीच सर्वांनी नदी स्वच्छ, पवित्र आणि प्रवाही ठेवली पाहिजे, असे आवाहन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी केले.

कोल्हापूर - धर्मामध्ये नदीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यासाठीच सर्वांनी नदी स्वच्छ, पवित्र आणि प्रवाही ठेवली पाहिजे, असे आवाहन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी केले. नमामि पंचगंगा उपक्रमांतर्गत नदीची आरती केली, या वेळी ते बोलत होते.

पंचगंगा नदीचा प्रकट दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वेळी पंचगंगा भक्ती सेवा मंडळ यांच्यावतीने होम आणि नदीची आरती केली जाते. गेली ११ वर्षे हा उपक्रम सुरू आहे. आज नमामि पंचगंगा या उपक्रमांतर्गत हा सोहळा करण्यात आला. या वेळी पंचगंगा विधान (होम) झाले.

त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, मंगलताई महाडिक यांच्या हस्ते नदीची आरती झाली. करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा झाला.

या वेळी शंकराचार्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘नदीला धर्मशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. नदीला मातेचा दर्जा दिला आहे. म्हणून नदी स्वच्छ, पवित्र आणि प्रवाही ठेवली पाहिजे. ते आपले कर्तव्य आहे.’’

या वेळी इतिहास अभ्यासक उमाकांत राणिंगा, पंचगंगा भक्ती सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कुंभार, शिवाजी पाटील, स्वप्नील मुळे, मधुकर मेहता, डॉ. शहाजी माने, किशोर घाटगे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. 

पंचगंगा विधान होम 
पंचगंगा नदीसाठी होम केला. यामध्ये करवीर माहात्म्यातील मंत्र म्हणण्यात आले. सातूच्या पिठाचे जलचर (मासा, कासव, मगर) करून ते नदीला अर्पण केले. सुहास जोशी, विशाल जोशी, श्रीधर कुलकर्णी, मयूर तांबे, हणमंत जोशी यांनी हा
 होम केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shankaracharya Vidyanarsinha Bharati comment