कोल्हापूर एसआयटीकडून शरद कळसकरला अटक 

कोल्हापूर एसआयटीकडून शरद कळसकरला अटक 

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येत पूर्वी साक्षीदार असलेल्या शरद भाऊसाहेब कळसकर याला आज कोल्हापूर एसआयटीने हत्येतील पिस्तुलाची विल्हेवाट लावल्याच्या संशयावरून मध्यरात्री अटक केली. दुपारी न्यायालयात हजर केले असता 18 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस.एस. राऊळ यांनी ही कोठडी सुनावली. एसआयटीने विशेष सत्र न्यायालय मुंबईतून त्याला काल ताब्यात घेतले. विशेष सरकारी वकील म्हणून अॅड.शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले. 

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येत आत्तापर्यंत आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. शरद भाऊसाहेब कळसकर (वय.25, रा.केसापूर, ता.दौलताबाद, जि.औरंगाबाद) हा नववा संशयित आरोपी आहे. कोल्हापूर एसआयटीने 24 ऑगस्ट 2018 ला साक्षीदार म्हणून पानसरे हत्येप्रकरणी त्याचा जबाब नोंदवला होता. त्यावेळी त्याने स्वतःचा सहभाग लपवून अधिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. पत्रकार गौरी लंकेश, नालासोपारा, अनिसचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर, विचारवंत एम. एम. कलबुर्गी अशा विविध तपासातून कळसकर पानसरे हत्येतही आरोपी असल्याचे संदर्भ पुढे आले. त्यामुळे कोल्हापूर एसआयटीने अधिक तपासासाठी शरदला काल रात्री अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले. येथे अॅड.शिवाजीराव राणे यांनी विविध मुद्दे मांडून दहा दिवस पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली.

मुद्यांमध्ये शरदने यापूर्वी दिलेल्या जबाबानुसार भरत कुरणे आणि सागर लाखे या दोघांनी मिळून पानसरे यांची हत्या केली, त्यानंतर ते कोवाड मार्गे बेळगावला गेले होते. तेथे दोघांनी हत्येतील पिस्तुल शरदला दाखवले होते. तसेच बेळगावच्या एस. टी. स्टॅंण्डवर झालेल्या बैठकीत तो उपस्थित होता. पिस्तुलचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती, अशी माहिती पुढे आली आहे. यापूर्वीही झालेल्या वेगवेगळ्या तपासात त्याच्याकडून आठ गावठी पिस्तुल ताब्यात घेतले आहेत.

पानसरे हत्येपूर्वी पाच-सहा दिवस शरद कोल्हापुरात वास्तव्यास होता. त्याच्याकडून आणखी माहिती घ्यायची आहे. त्याला साक्षीदार केल्यानंतर त्यांने स्वतःचा सहभाग लपवला आहे, असे मुद्दे मांडण्यात आले. 

संशयित आरोपीचे वकील संजय धर्माधिकारी यांनी 10 दिवसांची पोलिस कोठडी गरजेची नसल्याचे सांगितले. तसेच हत्याराची विल्हेवाट लावल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, तरीही केवळ संशय म्हणून अटक केली आहे. त्यामुळे दोन-तीन दिवसांत हा ते माहिती घेवू शकतात. त्यामुळे दहा दिवस पोलिस कोठडी नाकारावी असा युक्तीवाद केला. अखेर न्यायालयातने 18 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

तपास अधिकारी म्हणून अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा न्यायालयात उपस्थित होता. 
 
पानसरे हत्येतील पिस्तुलची विल्हेवाट कशी लावली याबाबतचा अधिक तपास नववा संशयित आरोपी शरद कळसकर याच्याकडे करायचा आहे. त्यासाठीच त्याला काल रात्री तीन वाजता कोल्हापूर एसआयटीने अटक केली आहे. त्याचा ताबा मुंबईतून घेतला आहे. त्याच्या पोलिस कोठडी दरम्यान आणखी माहिती पुढे येणार आहे. 18 जूनपर्यंत कोठडी मिळाली आहे. 
-  अॅड.शिवाजीराव राणे, 
 विशेष सरकारी वकील 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com