शरद पवार यांनी संध्यादेवी कुपेकर यांना दिली ही ‘ऑफर’

शरद पवार यांनी संध्यादेवी कुपेकर यांना दिली ही ‘ऑफर’

कोल्हापूर - ‘चंदगड विधानसभा मतदारसंघातून तुम्ही लढणार नसाल तर तुमच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांना रिंगणात उतरवा. त्यांना उमेदवारी देऊ,’ अशी ऑफर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार संध्यादेवी कुपेकर यांना दिली. 

कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या कार्याचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीकडूनच रिंगणात उतरले पाहिजे, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले. 

संध्यादेवी कुपेकर यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. श्रीमती कुपेकर यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी पक्षाकडे अर्जही केलेला नाही आणि मुलाखतही दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या कन्या डॉ. बाभूळकर या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. श्रीमती कुपेकर यांच्याकडून मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. युतीत कागल व चंदगड हे मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहेत.

कागलमध्ये भाजपकडून ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी जोरदार तयारी केली आहे. किंबहुना, युतीचे उमेदवार मीच असणार, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. हा मतदारसंघ सेनेने भाजपला सोडला तर चंदगड हा सेनेकडेच राहील. त्यामुळेच श्रीमती कुपेकर किंवा त्यांच्या कन्या डॉ. बाभूळकर यांचा निर्णय झालेला नाही.

या पार्श्‍वभूमीवर श्री. पवार यांची आज श्रीमती कुपेकर यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये भेट घेतली. सायंकाळी चारच्या सुमारास ही भेट झाली. या भेटीत श्री. पवार यांनी श्रीमती कुपेकर यांना तुम्ही लढणार नसाल तर तुमच्या कन्या डॉ. बाभूळकर यांना उमेदवारी देण्याचे आश्‍वासन दिले. पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात तुमचे काम चांगले आहे. त्याचबरोबर तुमच्या कन्या यांचेही काम चांगले असल्याचे सांगितले. यावर येत्या एक-दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय कळवण्यात येईल, असे श्रीमती कुपेकर यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते. 

...तर राजेश पाटील आघाडीचे उमेदवार 
श्रीमती कुपेकर येणाऱ्या निवडणुकीत स्वतः रिंगणात उतरणार नाहीत. दुसरीकडे त्यांच्या कन्या डॉ. बाभूळकर यांच्यासमोर मात्र भाजपचा पर्याय आहे. अशा परिस्थितीत कुपेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केल्यास या मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार म्हणून ‘गोकुळ’चे संचालक राजेश नरसिंगराव पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते. अलीकडेच श्री. पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती आणि त्यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत वाढलेला राबता यावरून तेच उमेदवार होऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com