कोल्हापूरचे नॉनव्हेज जगात भारी - शरद पवार

कोल्हापूरचे नॉनव्हेज जगात भारी - शरद पवार

कोल्हापूर - गेल्या अनेक वर्षांपासून देशभर फिरत असताना मी कोठेच नॉनव्हेज खात नाही. मात्र, कोल्हापूर आणि सातारा येथे आलो की आवर्जून नॉनव्हेज खातो, असे सांगत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी कोल्हापूर व सातारा येथील नॉनव्हेजची चांगलीच शिफारस केली. आपण राजकारणाबरोबरच एक  चांगले खवय्येही असल्याचे खासदार पवार यांनी दाखवून दिले. खासदार धनंजय महाडिक यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनानंतर महाडिक यांच्या निवासस्थानी अनौपचारिक गप्पा मारताना खासदार पवार 
बोलत होते. 

संसदीय उपनेते म्हणून निवड केलेल्या खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यासाठी शनिवारी (ता. १) दुपारी जेवणाचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, उद्योगपती व्ही. बी. पाटील उपस्थित होते. जेवणानंतर काही वेळाने आमदार हसन मुश्रीफही याठिकाणी 
दाखल झाले. 

यावेळी शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकऱ्याला उसाशिवाय दुसरे कोणतेही पीक तारू शकत नाही. मात्र, त्यासाठी पाणी खूप वापरतात, ही तक्रार करण्यात येत आहे. यासाठीच उसाला पर्याय म्हणून बीटची शेती करता येईल का?, यावर चर्चा करण्यासाठी सर्व साखर कारखानदारांच्या बैठकीचे आंबोली येथे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.तसेच, ‘‘देशातील साखर उद्योग अनेक अडचणींचा सामना करत आहे. आम्ही सत्तेत असताना दौरा करून आल्यानंतर किंवा शिष्टमंडळ भेटून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी शासन निर्णय काढत असू.’’ आता मात्र ही प्रक्रिया दिसत नसल्याचे सांगत केंद्र शासनाच्या कारभारावर त्यांनी असमाधान व्यक्‍त केले.

कृषिमंत्री म्हणतात...उसाची शेती बंद करा
उसाचे प्रश्‍न, साखरेचा दर या विषयावर मी सातत्याने संसदेत प्रश्‍न विचारतो. या प्रश्‍नासंदर्भात एकदा कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली. त्यांना देशातील ११ कोटी लोक या ऊस उद्योगाशी निगडित असल्याचे सांगत त्यावर काही निर्णय घेण्याची मागणी केली. यावर कृषिमंत्र्यांनी थेट उसाची शेतीच बंद करण्याचा सल्ला दिला, असे खासदार महाडिक यांनी सांगताच, एकच हशा पिकला. यावर खासदार पवार यांनी कृषिमंत्री काहीही सांगतात, अशी पुष्टी जोडली.

चौकट नको म्हणून आलो 
आमदार हसन मुश्रीफ हे खासदार महाडिक यांच्याकडे विलंबाने आले. याबाबत विचारणा केली असता, उगाच उद्याच्या अंकात चौकट नको म्हणून आलो, असे आमदार मुश्रीफ यांनी सांगताच एकच हशा पिकला. खासदार पवार यांनी तर मुश्रीफांच्या दंडाला हसतच धरत, त्यांच्या या प्रतिक्रियेला दाद दिली.

‘उचल’ हा शब्द कोठून आणला?
श्री. पवार म्हणाले, अलीकडे कोल्हापूर व या भागात एकरकमी उचल, हा शब्द ऐकायला मिळतो. तो कोठून आणला, अशी विचारणा त्यांनी केली. आजही गुजरातमध्ये तीन टप्प्यात उसाचे पैसे दिले जातात. एकदा ऊस साखर कारखान्यात घातला की, त्यानंतर सर्व साखर विकल्यानंतर आणि दिवाळीला तिसरा हप्ता देऊन उसाची सर्व रक्‍कम शेतकऱ्याला दिली जाते. ही पद्धतच योग्य असल्याचे पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com