साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडेच!

साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडेच!

कोल्हापूर - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लवकरच लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होईल. त्याला वेळ घालवून चालणार नसल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. जागावाटपाचा विषय फार राहिलेला नाही, तो जवळजवळ निकाली लागला आहे. साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडेच असेल, असे पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

लोकसभा निवडणूक ही काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासह इतर मित्रपक्षांद्वारे लढवली जाणार आहे. त्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि मी चर्चा केली आहे. जेथे ते प्रभावी आहेत, निवडून येण्याची क्षमता आहे, तेथे त्यांना जागा देण्याचा निर्णय झाला आहे. दोन-तीन ठिकाणच्या जागावाटपाचा प्रश्‍न होता; मात्र तो स्थानिक पातळीवरच सोडविला जाईल, त्या-त्या भागांतील प्रभावशाली नेत्यांना तेथून उमेदवारी दिली जाणार असल्याने जागावाटपाचा कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. कोल्हापूरसह सातारा आणि हातकणंगलेची जागाही राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल, असेही पवार यांनी नमूद केले.

संसदेचे अधिवेशन ३१ जानेवारीला बोलविले जाणार आहे. ते एक दिवसाचे असेल, असे पहिल्यांदा ठरले होते. त्यामध्ये निवडणुकीची घोषणा होईल, असेही वाटले होते. आता मात्र ते अधिवेशन सहा-सात दिवसांवर नेले आहे. त्यामुळे साडेचार वर्षांत मोदी सरकारला जे निर्णय घेणे शक्‍य झाले नाहीत, ते या अधिवेशनात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुढे वेळ घालवून चालणार नाही. लवकरच लोकसभेचे कॅम्पेनिंग सुरू करावे लागणार आहे. दोन्ही पक्षांचे नेते त्यांच्या सभांचे आयोजन करतील. औरंगाबाद, नागपूर, नाशिक यांसह अन्य ठिकाणी दोघांकडून एकत्रित सभा होतील, असेही खासदार पवार यांनी स्पष्ट केले.

एक चेहरा नाही
देशात ज्या राज्यात जो पक्ष प्रभावशाली आहे, तेथे त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा लढविली जाईल. त्यानंतर एकत्रित निर्णय घेतले जातील. पंतप्रधानपदाचा एक चेहरा ठेवून आम्ही निवडणूक लढवीत नाही. २००४ मध्येही मनमोहनसिंग यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय नंतर झाला होता. त्यानंतर त्यांनी दहा वर्षे सरकार चांगले चालविले. त्यामुळे आताही तसेच होईल, असेही पवार यांनी स्पष्ट करून सर्व मित्रपक्षांची आघाडी करून भाजपला प्रत्युत्तर देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com