स्वत:वर आरोप होताच सहकारमंत्र्यांची पवारांना क्‍लीनचीट 

प्रशांत देशपांडे
मंगळवार, 30 जुलै 2019

सहकारमंत्र्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना क्‍लिन चिट देत शरद पवार यांच्यावर एखाद्याने आरोप केल्यास त्यात त्यांना दोषी धरायचेच का, असे उत्तर दिले. 

सोलापूर : जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय अप्पाराव कोरे यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर जागा हडप करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप मंगळवारी केला. 33 पानांच्या पुराव्यानिशी कोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर संतापलेल्या सहकारमंत्र्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना क्‍लिन चिट देत शरद पवार यांच्यावर एखाद्याने आरोप केल्यास त्यात त्यांना दोषी धरायचेच का, असे उत्तर दिले. 

सोलापुरातील शासनाच्या पाच एकर जागेवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याची मागणी वराह व्यावसायिक संस्थेने काही वर्षांपूर्वी केला. मात्र, सहकारमंत्री देशमुख यांनी 19 एप्रिल 2017 मध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वेगळाचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामध्ये लोकमंगल बॅंकेच्या सभासदांसह बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना घरे द्यावीत, असे नमूद केल्याचेही कोरे म्हणाले. तरी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

दरम्यान, कोरे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना सहकारमंत्री म्हणाले की, लोकशाहीत कोणीही कोणावर आरोप करु शकतो. परंतु, कोरे यांनी पुराव्यानिशी बोलावे. शरद पवार यांच्यावर उद्या कोणीही काहीही आरोप करेल, मग त्यामध्ये त्यांना दोषी धरायचे का, असे उत्तर सहकारमंत्र्यांनी दिले. आरोप करणाऱ्यांनी आपण नेमक्‍या किती आणि कोणत्या जागा हडप केल्या अथवा करण्याचा प्रयत्न सुरु आहे, याची पुराव्यानिशी माहिती द्यावी, असे आव्हानही त्यांनी दिले. 

सहकारमंत्री पुन्हा वादाच्या भोवऱ्यात 
जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे यांनी काही महिन्यांपूर्वी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संस्थेने अवैधरित्या दूध भुकटी प्रकल्प लाटल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सहकारमंत्री देशमुख यांच्या मुलांसह अन्य व्यक्‍तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. आता या नव्या आरोपांमुळे सहकारमंत्री पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar gets clean cheat after allegations on cooperation minister Deshmukh