चौकट सांभाळून आघाडी करा : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

कोल्हापूर - काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रसने एकत्र यावे असा सूर सध्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे आघाडी करत असताना जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी चौकट सांभाळून आघाडी करावी. घराबाहेर जाऊन दुसऱ्याच्या घरात डोकावू नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनी आज शनिवारी कार्यकर्त्यांना सत्काराप्रसंगी दिला.

कोल्हापूर - काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रसने एकत्र यावे असा सूर सध्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे आघाडी करत असताना जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी चौकट सांभाळून आघाडी करावी. घराबाहेर जाऊन दुसऱ्याच्या घरात डोकावू नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनी आज शनिवारी कार्यकर्त्यांना सत्काराप्रसंगी दिला.

स्वबळावर गावाचा विकास करणारे राज्यातील कोल्हापूर हे एकमेव शहर असून संपूर्ण राज्याला दिशा देण्याची ताकद कोल्हापुरात आहे, असेही ते म्हणाले.
शासनाचा पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांचा जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ व महापौर हसिना फरास यांच्या हस्ते कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूरची त्यांनी मुक्‍तकंठाने प्रशंसा केली. खासदार पवार म्हणाले, कोल्हापूरचा सत्कार म्हणजे घरच्या लोकांनी केलेला सत्कार असे मी मानतो. कोल्हापूर नंतर औरंगाबाद, नाशिक, पुणे यांचा विकास झाला, पण हा विकास बाहेरुन आलेल्या लोकांमुळे झाला आहे. मोठ्या कंपन्या आल्यामुळे ती शहरे मोठी झाली. कोल्हापूरचा विकास मात्र तसा नाही. कोल्हापूरचा विकास येथील स्थानिक लोकांमुळेच झाला आहे. स्वबळावर गावाचा विकास करण्याची ताकद फक्‍त कोल्हापूरकरांमध्येच आहे. कोल्हापूरचा माणूस किती मोठा आहे ते 1963 मध्ये इजिप्त दौऱ्यावर असताना समजले. या दौऱ्यात शेती पहात असताना त्याठिकाणी विहिरीतील पाणी काढणाऱ्या इंजिनचा आवाज ऐकून ते पाहण्यासाठी गेलो. इंजिन पाहताना त्यावर लिहिलेले "कोल्हापूर मेड' दिसले. त्यानंतर कोल्हापूरला दौऱ्यावर आलो तेंव्हा या इंजिनची निर्मिती करणाऱ्या म्हादबा मेस्त्रीना भेटलो. शिक्षण नसतानाही त्यांनी या क्षेत्रात केलेली प्रगती थक्‍क करणारीच आहे. कष्ट करण्याची सवय, जिद्द आणि चिकाटी यामुळे कोल्हापूरचा माणूस जाईल त्या ठिकाणी आपला ठसा उमटवत असतो. त्यामुळेच राज्याला नवी दिशा देण्याची ताकद केवळ कोल्हापुरातच आहे.

काँग्रेस संपविण्याची भाषा काही मंडळी करत आहेत. काँग्रेस हा एक राजकीय विचार आहे आणि विचार कधी सांगून संपविता येत नाही. स्वातंत्र्यांच्या लढ्यात काँग्रेसचीच मंडळी पुढे होती. काँग्रेसने देशासाठी प्राणाची आहुती दिली आहे. देश स्वातंत्र्य करण्यासाठी लढा दिला. लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेवर आलेले आणि काँग्रेससंपविण्याची भाषा करणारे लोक त्यावेळी कोठे होते. त्यांची नावे देखील दिसत नाहीत. त्यामुळे कोणी कोणाला संपविण्याचा भाषा करणे योग्य नाही. लोक सत्ता देतात. यावेळी आपल्याला लोकांना नाकारले त्यातून आपण धडा घेतला पाहिजे. सध्या निवडणुकीचे वारे आहे. काँग्रेसआणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यावे असा सूर कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याबाबत एकत्र बसून निर्णय होईल. स्थानिक पातळीवर आघाडी करत असतानाही आपली चौकट सांभाळावी. घराबाहेर जाऊन दुसऱ्याच्या घरात डोकावू नका, असा सल्लाही खासदार पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला
स्वागत जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. प्रास्ताविक शहर अध्यक्ष राजेश लाटकर यांनी केले. आभार आदिल फरास यांनी मानले. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्याताई कुपेकर, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आर. के. पोवार तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Sharad Pawar guidance to activists