पंतप्रधानांनी पुढाकार घेतल्यास राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

दोन्ही सभागृहात आमचे पुरेसे संख्याबळ नाही. ज्या पक्षाचे दोन्ही सभागृहात मिळून फक्त 14 सदस्य आहेत, त्यांनी राष्ट्रपदीपदाची स्वप्न पाहणे उचित नाही.

सोलापूर : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना विश्‍वासात घेऊन सल्लामसलत केली तर राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध होऊ शकते'', असे संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी आज (सोमवार) येथे दिले. 

पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोलापूरकरांच्या वतीने आज त्यांचा नागरी सत्कार होत आहे. त्यानिमित्त आज ते सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. शासकीय विश्रामधाममध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते. 

राष्ट्रपतीपदासाठी आपले नाव चर्चेत आहे, असे विचारले असता पवार म्हणाले, "दोन्ही सभागृहात आमचे पुरेसे संख्याबळ नाही. ज्या पक्षाचे दोन्ही सभागृहात मिळून फक्त 14 सदस्य आहेत, त्यांनी राष्ट्रपदीपदाची स्वप्न पाहणे उचित नाही. उत्तर प्रदेशच्या निकालानंतर भाजपकडे पुरेसे संख्याबळ झाले आहे. मात्र मोदी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते.'' 

सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. मात्र पाण्याअभावी उसाची पुरेशा प्रमाणात लागवड झाली नाही. त्यामुळे अनेक कारखाने बंद पडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नाबार्ड व आरबीआयच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक लावणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील कारखाने पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही पवार म्हणाले. 

Web Title: Sharad Pawar hints at upopposed Presidential elections