sharad_pawar_udayanraje
sharad_pawar_udayanraje

शरद पवारांनी उदयनराजेंची अवहेलना केली : डॉ. दिलीप येळगावकर

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीत हीन वागणूक दिली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथील भेटीत आठ दिवसांनी या सांगून त्यांची अवहेलनाच केली. राष्ट्रवादी पक्ष म्हणजे इतर पक्षातून आलेले टोळकेच आहे. अनेकजण बंडखोरी करतात. उदयनराजेंनी स्वाभिमानी व्हावे आणि पुन्हा एकदा भाजपमध्ये यावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी केले. 

येथील शासकीय विश्रामगृहावर ते पत्रकारांशी वार्तालात करताना बोलत होते. डॉ. येळगावकर म्हणाले, "उदयनराजेंना जो पक्ष हीन वागणूक देत आहे, तो सोडून पुन्हा भाजपमध्ये यावे. भाजपमध्ये असताना जेम्स लेन प्रकरणी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी विचारांची लढाई विचारांनी होईल, असे स्पष्ट केले होते. तरीही उदयनराजेंनी जेम्स लेनचे कारण देऊन भाजप सोडला. उदयनराजेंचा सन्मान राखण्याऐवजी पक्षाच्या नेत्यांकडून त्यांना हीन वागणूक मिळत आहे. आठ दिवसांनी या, असे छत्रपतींना सांगितले जाते. त्यांनी आता स्वाभिमान जागरूक करून राजकीय भूमिका जाहीर केली पाहिजे.'' 

छत्रपती घराण्याबद्दल नितांत प्रेम आहे. छत्रपती घराण्यासाठी आमदारकी घालवली आहे. त्यावेळी घडलेल्या घटनेनंतर मतदारसंघात मतदान सुरू असताना साडेबारा वाजता भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आदेशामुळे औंध सोडून मी साताऱ्याकडे धाव घेतली. त्यामुळे माझा अवघा 500 मतांनी पराभव झाला होता. त्यांच्यासाठी मी त्याग केला असून एक पैशाचा फायदा मी घेतला नाही. त्यामुळे मला बोलण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक नेतेमंडळी उदयनराजेंचे मित्र आहेत. ते त्यांचा सन्मान राखतील. त्यामुळे त्यांनी पुन्हा भाजपमध्ये यावे, असे आवाहनही डॉ. येळगावकर यांनी केले. 

हलकटांना हाकला... 
मी उदयनराजेंचा जवळचा मित्र आहे. त्यांच्या जवळ राहून एक पैशाचाही फायदा करून घेतला नाही. त्यामुळे मी बोलताना घाबरत नाही. उदयनराजेंनी त्यांच्याजवळ राहून फायदा घेणाऱ्या सावंतासारखी "हलकट' माणसे हाकलून द्यावीत. नको त्या मार्गावर नेऊन, वातावरण खराब करणारी ही माणसे आहेत, असा निशाणाही उदयनराजेंच्या काही कार्यकर्त्यांवर साधला. उदयनराजेंना मोठे व्हायचे असेल तर त्यांनी स्वत:च्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे, अनुभवी लोकांचे ऐकले पाहिजे, असा मित्रत्वाचा सल्लाही त्यांनी दिला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com