शिंदेंच्या घरी नाश्‍ता, कुपेकरांकडे जेवण!

शिंदेंच्या घरी नाश्‍ता, कुपेकरांकडे जेवण!

गडहिंग्लज - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा आज गडहिंग्लज दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी कोठेही जाहीररीत्या राजकीय भाष्य केले नसले तरी पहिल्यांदाच जनता दलाचे नेते ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्या घरी त्यांनी दिलेली भेट राजकीयदृष्ट्या चर्चेची ठरली. ॲड. शिंदे यांच्याकडे पवार यांनी नाश्‍ता केला, तर आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कानडेवाडीतील वाड्यात जेवणाचा आस्वाद घेतला. स्थानिक राजकारणात शिंदे हे कुपेकरांचे विरोधक असले तरीसुद्धा पवारांनी दोघांनाही ‘वेळ’ देऊन राजकीय ‘मेळ’ साधल्याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात आहे. 

गडहिंग्लज पालिकेत ॲड. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाची सत्ता आहे. गडहिंग्लज शहर कागल विधानसभा मतदारसंघाला जोडले आहे. कोणत्याही निवडणुकीत जनता दलाच्या शहरातील ‘ताकदी’ला दुर्लक्षून चालत नाही, हे सर्वच नेत्यांना माहीत आहे. चंदगड मतदारसंघातही जनता दलाकडे मतांचे ‘पॉकेट’ आहे. शिंदे व कुपेकर तसे राजकीय विरोधक. शिंदेंनी एकदा विधानसभा निवडणुकीत बाबा कुपेकरांना जाहीर पाठिंबा दिला, तर अनेकदा त्यांच्या विरोधात शड्डूही ठोकले. पूर्वीपासूनच शिंदे व पवारांचे व्यक्तिगत संबंध राजकीय वर्तुळात चर्चेचे राहिले आहेत. आजही त्यांनी शिंदे यांच्याबरोबर असलेल्या मैत्रीच्या नात्याला उजाळा दिला. 

पवार यांच्या दौऱ्याची सुरवातच सकाळी दहाला शिंदे यांच्या ‘केशवसूत’ बंगल्यापासून झाली. या भेटीत राजकीय ‘गुप्तगू’ होण्याची अपेक्षा जाणकारांची होती. परंतु, ती फोल ठरली. केवळ नाश्‍ता करून ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. 

दरम्यान, दुपारी अडीचच्या सुमारास पवार यांनी आमदार कुपेकरांच्या कानडेवाडीतील वाड्याला भेट दिली. आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदिनी बाभूळकर, रामराजे कुपेकर आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पवारांनी बाबा कुपेकरांच्या स्मारकाला अभिवादन केले. कुपेकरांच्या वाड्यावर पाचशेहून अधिक कार्यकर्ते जमले होते. यामुळे येथे पवारांचे मार्गदर्शन होण्यासह चंदगड मतदारसंघातील चित्र स्पष्ट करतील, अशी अपेक्षा होती. आगामी निवडणुकीसाठी आमदार संध्यादेवी यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्या उमेदवारीची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. यासंदर्भात काही तरी निर्णय जाहीर करतील, या अपेक्षेने राजकीय क्षेत्राच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु, तसे घडले नाही. 

भेटीचा हेतू गुलदस्त्यात...
श्रीपतरावांची कन्या स्वाती कोरी यांना स्वत: अप्रत्यक्षपणे ‘राष्ट्रवादी’चे जाहीर निमंत्रण देण्याचे एकमेव राजकीय वक्तव्य वगळता कुठेही पवारांनी राजकारणावर भाष्य केले नाही. परंतु, या दौऱ्यात ॲड. शिंदे यांच्या घरी पहिल्यांदाच भेट देण्यामागचा पवारांचा हेतू काय होता, हे कळण्यासाठी आता प्रत्यक्ष आगामी निवडणुकांची वाट पाहावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com