शरद पवार, प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी; नितीन चौगुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar Prakash Ambedkar apologize to people of Maharashtra Nitin Chowgule sangli

शरद पवार, प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी; नितीन चौगुले

सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगल प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या विरोधात पोलिस तपासात कोणताही पुरावा नाही. यामुळे त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले नसल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले. त्यांनी त्यांचा यात सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आबंडेकर यांनी अकारण हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप केले. जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागवी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, दंगलीतील सुत्रधारांच्या अटकेसाठी राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. चौगुले म्हणाले, ‘‘कोरेगाव भीमा येथील दंग्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांचा कोणताही संबंध नव्हता. तरीही आधारविना प्रकाश आंबेडकर व शरद पवार यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या सहभागाचा आरोप केला. मानवी आयोगासमोर ज्यावेळी लेखी म्हणणे मांडण्याची वेळ आली त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी यासंर्भात काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांची ही दुटप्पी भूमिका समोर आली आहे. राज्यातील दलित समाजांत यामुळे गैरसमज निर्माण करण्यात आले. राज्यभर दंगली घडविण्याचे कारस्थान यामागे होते. त्यांनी जनतेची माफी मागावी. दंग्यामागे राज्यातील काही संघटनांचा समावेश आहे. शासनाने व पोलिसांनी आता या प्रकरणातील खऱ्या सुत्रधारांना शोधावे. जोपर्यंत त्यांना अटक होऊन कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान लढत राहणार. सुरुवातीला निवेदने देण्यात येतील. त्यानंतरही वेळप्रसंगी मोर्चेही काढण्यात येतील.

ते म्हणाले, ‘‘तत्कालिन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा व अन्य अधिकाऱ्यांनी हिंदुत्ववादी संघटना तसेच दलित संघटनांची एकत्रित बैठक घेतल्यामुळे सांगलीत शांतता प्रस्थापित झाली. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांनाही शांततेचे श्रेय जाते. घटनेनंतर लगेचच उदयनराजे यांनी आम्हाला पाठींबा दिला होता. सांगलीतील २८ दलित संघटनांनीही आम्हाला पाठींबा दर्शवून विश्‍वास व्यक्त केला होता. पुणे पोलिसांनी प्रामाणिकपणे व निपक्षपातीपणाने तपास केल्याने सत्य बाहेर आले. त्यामुळे पुणे पोलिसांचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी आता सुत्रधाराचा शोध घेऊन कारवाई करावी, ही अपेक्षा आहे.’’ भोंग्याबाबात प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले,‘‘मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत मांडलेले मत योग्य आहे. आम्ही त्याचे समर्थन करतो, पण दुसरीकडे मशिदींनी स्वतःहून पुढाकार घेत भोंगे बंद केले आहेत. त्यामुळे राज्यातही असा प्रतिसाद मिळेल.

Web Title: Sharad Pawar Prakash Ambedkar Apologize To People Of Maharashtra Nitin Chowgule Sangli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top