दुर्लक्ष केल्यास सरकारचा बंदोबस्त करू  - शरद पवार

दुर्लक्ष केल्यास सरकारचा बंदोबस्त करू  - शरद पवार

दहिवडी - संकट मोठं आहे, पण धीर सोडून चालणार नाही. सगळ्यांना एकत्र येऊन या संकटावर मात करावी लागेल. सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे. ते देण्याचा आग्रह आम्ही करू. नाही दिलं तर सरकारचा काय बंदोबस्त करायचा तोही विचार करू, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी माणदेशी जनतेला दिलासा दिला. 

माण तालुक्‍यातील बिजवडी, शिंदी खुर्द, वावरहिरे, भालवडी, मार्डी, पानवण व म्हसवड या गावांचा दुष्काळ पाहणी दौरा केला. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, सुभाष नरळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, पुण्याचे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, सभापती रमेश पाटोळे, संदीप मांडवे, कविता म्हेत्रे, बाळासाहेब सावंत, बाळासाहेब काळे, रमेश शिंदे, सुरेंद्र मोरे, प्रशांत वीरकर उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, ""माणमध्ये दुष्काळाची भयंकर स्थिती आहे. 1972 च्या दुष्काळापेक्षाही हा दुष्काळ भयंकर आहे. गेल्या दोन वर्षांपासून या भागात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे लोकांचे जगणे अशक्‍य झाले. जगण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी स्थलांतर सुरू केले आहे. त्यातून मार्ग काढावा लागेल. राज्य सरकारने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. स्वच्छ पाणी, जनावरांना पाणी, चारा मिळाला पाहिजे. छावण्यांची संख्या वाढवली पाहिजे. अनुदानात वाढ करून ती सव्वाशेच्या आसपास करावी. आम्ही त्यावेळी 76 छावण्या काढल्या. आता 19 आहेत. हे राजकारण करण्याचे दिवस नाहीत. सर्व परिस्थिती पाहून राज्य सरकारसमोर तुमचं गाऱ्हाणं माडावं म्हणून मी दौरा करतोय.'' 

पाणी पुरेसं नाही, लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी मिळत नाही, जे मिळतंय ते पिण्यायोग्य नाही, पीक विमा मिळाला नाही, पीक कर्जमाफ झाले नाही, छावणीत मिळणारा चारा व मिळणारे पाणी पुरेसे नाही, रेशनकार्डावर पाच जनावरे हा नियम अडचणीचा आहे. त्यामुळे कुटुंबात वाद सुरू झालेत, अशा समस्या शेतकऱ्यांनी श्री. पवार यांच्यासमोर मांडल्या. या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

कडक उन्हातही दिवसभर दौरा 
प्रथमच शरद पवार यांनी संपूर्ण दिवस माण तालुक्‍यासाठी दिला. मे महिन्यातील कडक उन्हात त्यांनी माणच्या पश्‍चिमेकडील शिंदी खुर्दपासून माणच्या पूर्वेकडील पानवणपर्यंत विविध गावांना भेटी देत दुष्काळाची पाहणी करत टंचाईचा आढावा घेतला. पाण्याअभावी जळालेल्या डाळिंब बागेची पाहणी त्यांनी केली. गावागावांतील पाणीपुरवठ्याची माहिती घेतली. त्याचबरोबर छावणीत जावून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com