शेळीला वाचविण्यासाठी "ती'ची बिबट्याशी झुंज

आनंद गायकवाड
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

शेतात चरण्यासाठी गेलेल्या शेळ्यांच्या कळपावर भरदिवसा बिबट्याने हल्ला केला. जबड्यात एक शेळी पकडून जात असताना, त्याला रणरागिणीचा सामना करावा लागला. बिबट्याच्या तोंडातून शेळी सोडविण्यासाठी तिने निकराची झुंज दिली

संगमनेर : शेतात चरण्यासाठी गेलेल्या शेळ्यांच्या कळपावर भरदिवसा बिबट्याने हल्ला केला. जबड्यात एक शेळी पकडून जात असताना, त्याला रणरागिणीचा सामना करावा लागला. बिबट्याच्या तोंडातून शेळी सोडविण्यासाठी तिने निकराची झुंज दिली. बिबट्याने पंजाचा फटका मारल्याने ती जखमी झाली. तिच्या प्रतिकारापुढे बिबट्याने माघार घेतली. शेळीला सोडून त्याने पळ काढला; पण गंभीर जखमी झाल्याने शेळीचा मृत्यू झाला. कुरण येथे काल (सोमवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास हा थरार घडला.

राधाबाई मोरे असे या रणरागिणीचे नाव. बिबट्याच्या हल्ल्यात त्यांच्या हाताला जखम झाली आहे. तालुक्‍याच्या पठार भागातील मोरे कुटुंब कुरण येथील एका शेतकऱ्याकडे वाट्याने शेती करतात. उदरनिर्वाहासाठी शेळ्यापालनाचा व्यवसाय ते करतात. या कुटुंबातील राधाबाई मोरे सोमवारी सकाळी कुरण येथील वनक्षेत्राजवळ शेळ्या चारण्यासाठी गेली होती. परिसरात घनदाट गवत व झाडाझुडूपे आहेत. त्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील एका शेळीवर हल्ला करून पकडले.

शेळीला वाचविण्यासाठी राधाबाई यांनी बिबट्याशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या धाडसाने जोरदार प्रतिकार सुरू केला. बिबट्या व राधाबाई यांच्यात शेळीला वाचविण्यासाठी झुंज रंगली होती. काही केल्या राधाबाई शेळी सोडत नसल्याचे पाहून चिडलेल्या बिबट्याने त्यांच्या डाव्या हातावर पंजाने वार केला. त्यात राधाबाई जखमी झाल्या. मात्र, त्यांच्या जोरदार प्रतिकारामुळे बिबट्याने अखेर माघार घेतली.

शेळीला सोडून त्याने पळ काढला. राधाबाई यांचा विजय झाला; पण त्या शेळी वाचवू शकल्या नाहीत. बिबट्याची हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने शेळीचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत माहिती समजताच, संगमनेर वनपरिक्षेत्रचे वनक्षेत्रपाल एस. एस. माळी, वनपाल अंबादास मेहेत्रे, वनरक्षक एस. बी. ढवळे, संतोष पारधी आदींनी घटनास्थळी भेट दिली. जखमी राधाबाई यांच्यावर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालायात उपचार करण्यात आले. कुरण परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: she fight with leopard to save goat