झुंज तिची आपत्तींच्या फेऱ्यांशी... (व्हिडिओ)

शैलेश पेटकर  
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

आपत्ततींतून सावरणारी ही माऊली शिरोळ तालुक्‍यातील धरणगुत्ती गावची. श्रीमती कल्पना पाटील यांचा हा जीवनसंघर्ष मनाला वेदना देणारा. महापूरात आयुष्यच वाहून गेलेल्या प्रत्येकाला जगण्याची प्रेरणा देणारा.

सांगली : पती हिरावले. पदरी तीन मुली. नेटाने संसार सावरत त्या माऊलीने मोलमजुरीचे आयुष्य जगत लेकींची लग्ने करून दिली. त्यांचा संसारासाठी आयुष्य खर्ची घातले. या मोठ्या जबाबदारीतून त्या बाहेर पडल्या आणि महापूराच्या तडाख्यात सापडल्या. सारे वाहून गेलेल्या घरी साफ सफाईला आल्या तर तिथे त्यांना सापाने दंश केला. उपचार घेऊन पुन्हा सुजल्या हाताने घरी आल्या तर, समोर दिसले ढासळलेले घर...

नियतीचा फेरा काही संपत नव्हता. अशा काळात धावून आले समाजातील दातृत्व. समाजाच्या दातृत्वातून सावरणारी ही माऊली शिरोळ तालुक्‍यातील धरणगुत्ती गावची. श्रीमती कल्पना पाटील यांचा हा जीवनसंघर्ष मनाला वेदना देणारा. महापूरात आयुष्यच वाहून गेलेल्या प्रत्येकाला जगण्याची प्रेरणा देणारा.

अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत संसार सुरू असताना पती धुळगोंडा यांचे आकस्मिक निधन झाले. तीन लेकींसह संसाराचा भार पेलण्यासाठी श्रीमती कल्पना यांनी धीराने कंबर कसली. गावातच शेतमजुरी करीत त्यांनी कुटूंबाचा गाढा ओढला. दीड वर्षापूर्वीच तिसऱ्या मुलीचं लग्न झालं आणि एका जबाबदारीतून त्या मोकळ्या झाल्या. त्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या परीने त्यांना आधार दिला. तिन्ही मुली सासरी नांदत आहेत तर, त्या गावीच मोलमजुरी करतात.

थोडी उसंत मिळाली असताना पंधरा दिवसांपूर्वी कृष्णामाईच्या महाप्रलयात संसार वाहून गेला. कौलारु घराच्या छताला पाणी भिडले. होत्याचे नव्हते झाले. महापूरानंतर पाणावल्या डोळ्यांनी त्यांनी घरी धाव घेतली. स्वच्छता करताना त्यांना सापाने दंश केला. वेळीच उपचार झाल्याने त्या बचावल्या. दोन-चार दिवसात औषधोपचारानंतर त्या सुजलेल्या हाताने पुन्हा साफसफाईला लागल्या तर, पूराच्या पाण्याने कुमकुवत झालेले त्यांचे घर कोसळले.

संकटांची मालिका थांबत नव्हती. काही ग्रामस्थांनी इरसेड संस्थेला या आपत्तीची माहिती दिली. या संस्थेचे राजेश बोंगाळे यांनीच सकाळला या घटनेची पहिल्यांदा माहिती दिली. संस्थेनेही तातडीने त्यांना मदतीचा हात दिला. घरगुती साहित्यांसह छोट्या घराचीही व्यवस्था करण्यास सुरूवात केली.

आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात...
गेल्या पंचवीस वर्षांपासून आम्ही समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांत महिला सक्षमीकरणाचे काम करीत आहोत. शिरोळ तालुक्‍यातील सध्याच्या आपत्तीत कल्पना पाटील यांच्यासारखीच अनेकांची कहाणी आहे. आम्ही त्यांच्यासाठी काम करीत आहोतच. मात्र आमच्या प्रयत्नांना समाजाचे बळ हवे आहे.

- किरण कुलकर्णी, प्रमुख, इरसेड संस्था


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She fought with disasters