कुणब्याची पोर, नाही झाली जिवाला घोर... "पीएसआय', तेही मुक्त विद्यापीठात शिकून

सूर्यकांत वरकड
Saturday, 21 March 2020

2015-2016मध्ये नगरच्या न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय केंद्रातून मुक्त विद्यापीठांतर्गत बी. ए. उत्तीर्ण होऊन तिने एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात ती उत्तीर्ण झाली.

नगर : कुणब्या घरी पोर झाली की ती जीवाला घोर असते... असं जुनी पिढी म्हणायची. कारण कुणबिक करून पोट जाळता यायचं नाही. पाऊस पडलाच तरच शेती. त्यात पोरीच्या लग्नाचा खर्च तिच्या बापाला रातरात झोप येऊ द्यायचा नाही, ही असली घोराच्या पाठीमागची कारणं सांगितली जात. ती खरीही आहेत. पण शेतकऱ्याच्या पोरी आता शासन, प्रशासनात यायला लागल्यात, तेही अधिकारी म्हणून. 

Deepali shinde

वडील धोंडिंबा, बंधू सोन्याबापू व आई द्वारकाबाईसह आनंद व्यक्त करताना दीपाली.

आष्टी तालुक्‍यातील कुंभेफळ येथील शेतकरी कुटुंबातील दीपाली शिंदे या तरुणीने तेच केलं. एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत गावात पहिल्यांदा "पीएसआय' होण्याचा बहुमान मिळविला आहे. 
आष्टी तालुक्‍यातील दुर्गम भागात कुंभेफळ गाव आहे. सात एकर कोरडवाहू शेतीवर उपजीविका अवलंबून असलेल्या धोंडिबा शिंदे यांनी काबाडकष्ट करून दोन्ही मुलांना शिकविले.

हेही वाचा - सात दरोडेखोर पकडले

धोंडिबा शिंदे व त्यांच्या पत्नी द्वारकाबाई दोन्ही अशिक्षित. त्यांना सोन्याबापू हा मुलगा, तर दीपाली ही मुलगी. आष्टी तालुक्‍यात कायम दुष्काळी परिस्थिती. त्यातच कुटुंबाची सगळी मदार शेतीतून निघणाऱ्या उत्पन्नावरच. आई-वडील अशिक्षित आणि घरची परिस्थिती गरिबीची असल्याने दीपालीने शेतात काम करून शिक्षण सुरूच ठेवले.

दीपालीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खुंटेफळ येथील लोकमान्य विद्यालयात आणि बारावीचे शिक्षण धानोरे येथील जनता उच्च माध्यमिक विद्यालयात झाले.

बारावी पास होऊन ती 2014 मध्ये राज्य उत्पादनशुल्क या खात्यात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाली. तिला पोस्टिंगही नगरलाच मिळाली. नंतर 2015-2016मध्ये नगरच्या न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय केंद्रातून मुक्त विद्यापीठांतर्गत बी. ए. उत्तीर्ण होऊन तिने एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात ती उत्तीर्ण झाली.

पीएसआय परीक्षेत यश मिळवले. कठोर मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेली दीपाली आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना देते. कुंभेफळ ग्रामस्थांनी गावात तिचा सत्कार करून तिच्या यशाचे कौतुक केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She went to PSI after studying in an open university