राधानगरी अभयारण्यात ‘शेकरू’ धरतोय बाळसं

राधानगरी अभयारण्यात ‘शेकरू’ धरतोय बाळसं

राशिवडे बुद्रुक - तो इवलासा, पण देखणा जीव. या झाडांवरून त्या झाडावर चिक्‌...चिक्‌... करत उड्या मारू लागला की, शेजारून जाणारा वाटसरू काहीसा थांबून त्याला बघतच बसतो. त्याच्या तपकिरी रंगावर पांढरा पट्टा, शेपटीचा लांबलचक झुपकेदार गोंडा आणि त्याचं स्वतःच्याच जगात रममाण होणं सारंच भावतं. तो राज्य प्राणी ‘शेकरू’ आता राधानगरी अभयारण्यात बाळसं धरू लागला आहे. गव्यांचे जंगल म्हणून प्रसिद्ध असलेल्या या परिसरात या जिवाच्या लीला ठाईठाई दिसत आहेत.

जैवविविधतेचा भरगच्चपणा आणि दिवसेंदिवस वन्यप्राण्यांचा आदिवास वाढू लागल्याने त्यांचे निश्‍चित सुरक्षित ठिकाण म्हणून राधानगरी अभयारण्याची ओळख वाढली. येथे आता गव्यांबरोबरच महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या ‘शेकरू’ची संख्या लक्षणीय दिसू लागली आहे. खारीच्या कुळातील आकर्षक असलेला हा जीव येथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालत आहे. त्यांच्या वाढत्या संख्येमुळे एक समृद्ध जंगल म्हणून राधानगरीचे नाव अधोरेखित होत आहे.

समूहाने राहणारा असला तरी शेकरू या प्राण्याची अनेक वेगळी लक्षणे आहेत. तो उंच झाडावर घरटी बांधतोच; पण एक शेकरू चार ते पाच घरटी बांधतो आणि आपल्या जोडीदार मादीला पसंत पडेल त्या घरट्यात संसार थाटतो. अशी घरटी या अभयारण्यात अनेक ठिकाणी दिसू लागली आहेत. 

राधानगरी वन्यजीवच्या हत्तीमहल कार्यालयाच्या आवारात अनेक वर्षे त्याचे अस्तित्व आहे. त्याचा या परिसरात वावर असल्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना येथील शेकरूंचा लळा लागला आहे. कारिवडे, डिगस रस्त्यांवर अनेक झाडांवर त्यांची वस्तीस्थाने दिसत आहेत. राधानगरी तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील उगवाई मंदिराचा परिसर आता या राज्य प्राण्यांचे हक्काचे ठिकाण बनले आहे. येथील उंबर, हिरडा आणि रानमेव्यांवर त्यांचाच हक्क आहे. उगवाईचा परिसर त्यांच्यामुळेच रंगीत बनला आहे. हसणे गावाच्या शिवारात असलेल्या लघुपाटबंधारे तलाव आणि शेळप, बांबर परिसरातही त्याचा अधिवास जाणवू लागल्याने हा इवलासा पण राज्याचा प्राणी म्हणून मान मिळालेला जीव अभयारण्यात बहर 
आणू लागला आहे. 

जैवविविधतेने समृद्ध असलेल्या राधानगरी अभयारण्यात आता वन्यजीवांची संख्या वाढत आहे, हे निश्‍चितच प्रगतीचे आणि खात्याला अभिमानाचे आहे. गव्यांबरोबर शेकरू हा राज्यप्राणी वाढत आहे. त्याची अनेक ठिकाणी वस्तीस्थाने निर्माण झाली आहेत. हे समृद्धीचे लक्षण आहे. येथील वन्यजीवांच्या वाढीसाठी आणखी प्रयत्न सुरू आहेत. 
- राजेंद्र धुमाळ,
वनक्षेत्रपाल राधानगरी वन्यजीव विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com