निवडणूक रिंगणात शेखर गोरे?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

मलवडी - मिनी विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोचली असताना माण तालुक्‍यातील जनसामान्यांच्यात एक प्रश्नाने चांगलेच काहूर माजवले आहे. तो प्रश्न म्हणजे राष्ट्रवादीचे युवा नेते शेखर गोरे हे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार का? तसे झाल्यास बिदाल गटात गोरे विरुद्ध गोरे अशी लढत होणार का? अशी चर्चा सुरू आहे.

मलवडी - मिनी विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोचली असताना माण तालुक्‍यातील जनसामान्यांच्यात एक प्रश्नाने चांगलेच काहूर माजवले आहे. तो प्रश्न म्हणजे राष्ट्रवादीचे युवा नेते शेखर गोरे हे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार का? तसे झाल्यास बिदाल गटात गोरे विरुद्ध गोरे अशी लढत होणार का? अशी चर्चा सुरू आहे.

"रासप'मधून शेखर गोरे यांनी प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी चांगलीच चार्ज झाली आहे. त्यातच दहिवडी येथे झालेल्या सभेने कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनीही माण तालुक्‍यावर वैयक्तिक लक्ष आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचाच, असा इरादा शेखर गोरे यांनी जाहीर केला आहे. नामनिर्देशन पत्र भरण्यास फक्त दोन दिवस उरले असतानाही अपवाद वगळता बहुतेक जागांवरील उमेदवार निश्‍चित झालेले नाहीत. त्यातच आंधळी गट व नव्याने तयार झालेल्या बिदाल गटात राष्ट्रवादीचे उमेदवार कोण असणार याबद्दल उत्सुकता आहे.

आंधळी गट हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे तेथे राष्ट्रवादीतून पांढरवाडीचे लक्ष्मण सूर्यवंशी, आंधळीचे बाबासाहेब पवार, मलवडीचे विजयकुमार मगर, स्वरूपखानवाडीचे गणेश सत्रे निवडणूक लढवणार, की स्वतः शेखर गोरे मैदानात उतरणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. बिदाल गट हा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे तेथून विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, बिदालचे मोहन बनकर यापैकी कोणाला संधी मिळणार, की शेखर गोरे ही संधी घेणार, हे पाहावे लागेल. या गटातून शेखर गोरे यांच्याविरुद्ध कॉंग्रेसकडून त्यांचेच ज्येष्ठ बंधू अंकुश गोरे किंवा अरुण गोरे अशी लढत होणार का, अशीही चर्चा आहे.
एकूणच शेखर गोरे हे स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरून कार्यकर्त्यांना बळ देणार, की निवडणुकीची सर्व सूत्रे हातात असल्यामुळे सर्व गट व गणांसाठी वेळ देणार याचे उत्तर मिळण्यासाठी फक्त दोन दिवसांचा कालावधी उरला आहे.

मराठा क्रांती मोर्चाने वातावरणनिर्मिती

 

आंधळी गट हा आमदार जयकुमार गोरे यांचा बालेकिल्ला समजला जातो. या गटाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. मराठा क्रांती मोर्चाचा चांगलाच जोर आहे. त्यामुळे यापूर्वी जरी या गटाने सर्वसाधारण आरक्षण असताना नागरिकांच्या मागास प्रवर्गातील उमेदवाराला स्वीकारले असले, तरी या वेळी तोच कित्ता गिरविला जाईल, याची खात्री नाही.

 

Web Title: shekhar gore again election