साताऱ्यात शिवसेनेची ताकद वाढणार; मोठा नेता गळाला लागण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

माण मधील युवा नेते शेखर गोरे हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या समवेत आज मुंबईत मातोश्रीवर पोहोचले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करण्याबाबतचा आज निर्णय‌ घेण्याची शक्यता आहे.

सातारा : माण मधील युवा नेते शेखर गोरे हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या समवेत आज मुंबईत मातोश्रीवर पोहोचले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करण्याबाबतचा आज निर्णय‌ घेण्याची शक्यता आहे.

पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही त्यामुळे फलटण येथील शरद पवारांच्या सभेत शेखर गोरे यांच्या समर्थकांनी गोंधळ घालून आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत यापुढे माण विधानसभा निवडणूक अपक्ष लढण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर माण मतदारसंघात आमदार जयकुमार गोरेयांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी आघाडी उघडली. पण, या आघाडीतील नेत्यांनी दोन्ही गोरे बंधूंना विरोध केला आहे. तसेच, शेखर गोरे आघाडीत येणार असतील तर त्यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून येऊ नये असे स्पष्ट केले. परिणामी, शेखर गोरेंची अडचण झाल्यामुळे त्यांनी शेवटी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.

सध्यातरी ते मातोश्रीवर पोहोचले आहेत. त्यांच्या सोबत माण खटावचे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव हे आहेत. सध्या त्यांची मातोश्रीवर चर्चा सुरू आहे. कदाचित ते शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता असली तरी माण-खटावमधील स्थानिक नेत्यांचा मात्र शेखर गोरे यांच्या प्रवेशाला विरोध आहे.

शिवसेनेचे नेते रंजित देशमुख, अनिल सुभेदार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांचा शेखर गोरे यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध असल्याचे समजत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shekhar gore may enters in Shivsena