देवेंद्रजी, सांगलीसाठी काही ठोस करा

शेखर जोशी
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुधवारी होत असलेला दौरा प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होतो आहे. यापूर्वी त्यांचे चार दौरे ठरले आणि रद्द झाले होते. दरम्यानच्या काळात बरेच पाणी वाहून गेले आहे. संपूर्ण राज्याला आणि विशेषत: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना धक्‍का देणारा निकाल महापालिका निवडणुकीत सांगलीकरांनी दिला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुधवारी होत असलेला दौरा प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होतो आहे. यापूर्वी त्यांचे चार दौरे ठरले आणि रद्द झाले होते. दरम्यानच्या काळात बरेच पाणी वाहून गेले आहे. संपूर्ण राज्याला आणि विशेषत: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना धक्‍का देणारा निकाल महापालिका निवडणुकीत सांगलीकरांनी दिला. याचे कौतुक ट्विट करून पंतप्रधान मोदींनीही केले होते. पण प्रचारासाठी मुख्यमंत्री येऊ शकले नाहीत की, विजय साजरा करण्यासाठीही ते आले नाहीत. चार आमदार, एक खासदार, जिल्हा परिषद आणि आता महापालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्तेचा विस्तार भाजपने फक्‍त चार वर्षांत केला आहे. मात्र, ही भरभराट भाजपची झाली त्यात तुलनेत जिल्ह्याच्या विकासाची झाली की नाही, याचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशी सांगली जिल्ह्यातील तमाम जनतेची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्र्यांची सलग पाच तासांची मॅरेथान प्रशासकीय बैठक होणार आहे. पहिल्यांदाच असे घडते आहे की, मुख्यमंत्री येत आहेत आणि कोणताही  राजकीय कार्यक्रम जिल्ह्यात नाही. फक्‍त अधिकाऱ्यांनी काय काम केले याचा थेट आढावा ते घेणार आहेत. यातून सांगलीने किती विकास केला याची मुख्यमंत्र्यांना कल्पना येईलच; पण त्याचबरोबर ज्या जिल्ह्यातील जनतेने भाजपला भरभरून यश दिले, त्यांच्यासाठी सरकारने गेल्या चार वर्षांत काय दिले याचीही चर्चा होणे या निमित्ताने अपेक्षित आहे.

तुलनेने विकासाचे प्राधान्य देताना कोल्हापूर, सोलापूरसह विविध शहरांना ‘किती घेशील दो कराने’ असे दिले आणि सांगलीकडे त्या तुलनेने दुर्लक्ष झाल्याची खंत आहे. अर्थात यासाठी प्रशासनातील विविध विभागांची गतिमानताही कळीचा मुद्दा आहे. याबाबत दिवंगत नेते पतंगराव कदम नेहमी म्हणायचे, प्रशासन हे अजगरासारखे असते. त्याला सतत काठी टोचून जागे करावे लागते, हा अनुभव आपल्या नेत्यांचाही असावा. उद्या आपण सलग पाच तास प्रशासनाची जी झाडाझडती घेणार आहात, यामध्ये विविध योजनांचे काय हाल झाले आहेत, याची कल्पना येईलच!

कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रकांतदादांचे चांगले लक्ष आहे; पण सांगलीला पूर्णवेळ देईल, असा पालकमंत्री पहिल्यापासून मिळालेला नाही. सांगलीसाठी निधी आणणे असेल किंवा योजना राबविणे असेल याबाबत येथील नेतृत्व कमी पडत असल्याची टीका विरोधक  करत असतात. एकही मंत्री नाही ही खंत नेते, कार्यकर्त्यांची आहेच! दरवेळच्या विस्तारावेळी येथील काही नावे चर्चेत असतात हे खरे! पण सांगलीकरांना मंत्रिपद द्या अथवा न द्या, ही काय जनतेची प्राधान्याची मागणी नाही.

किमान पायाभूत विकास तरी येथे घडावा तरच स्थलांतरित होत चाललेला तरुण येथेच थांबेल. अन्यथा येथील शहरे फक्‍त निवृत्तांची आश्रयस्थाने ठरतील. गेल्या चार वर्षांत काही सांगावे असे विकासकाम येथे घडलेले नाही, याची खंतही सांगलीकरांना वाटते आहे. यापूर्वी तीन मंत्री असतानाही महापालिका क्षेत्रात कोणतेही मोठे विकासकाम झाले नाही. आता केंद्रात, राज्यात आणि महापालिकेसह जिल्हा परिषदेत एकाच पक्षाची सत्ता असतानाही विकासाचा अनुभव जनतेला यावा, अशी अपेक्षा आहे.

भाजपच्या सत्तेचा कालावधी अत्यंत अल्प राहिला असला तरी येथील अपुऱ्या योजनांची पूर्ती, घोषित प्रकल्पांचा किमान प्रारंभ या गोष्टी अपेक्षित आहेत. याशिवाय आधीच्या नेत्यांनी येथे केलेल्या भानगडींचे काय? अनेक संस्था बुडाल्या, बॅंका लयाला गेल्या, जनतेला बुडविणाऱ्यांवर कोठेही कारवाई होताना जनतेने अनुभवली नाही. महापालिकेतील अनेक भानगडींच्याही चौकशी नगरविकासकडे लटकल्या आहेत. बीओटीतून ढापलेल्या जागांचेही नगरविकासला काही सोयरसुतक नाही राहिले?

तुमच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा चेहरा नगरविकासला लाभला असतानाही ‘उजाडत का नाही?’ असे यासाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्यांना वाटते आहे. जिल्ह्यातील शासनाच्या निवासी आश्रमशाळांमध्ये मुलींवर अमानुष अत्याचार होताहेत तरीही ठोस कारवाईची तत्परता दिसत नाही. अशी एक ना दोन, अनेक प्रकरणे न्यायासाठी सरकारी दरबारी लटकली आहेत.

जिल्ह्यातील गुन्हेगारीही तुलनेने वाढते आहे. उद्योगांची भरभराट होताना दिसत नाही. दुष्काळाने शेतकरीही खचून चालला आहे आणि दोन्ही काँग्रेसच्या काळात रखडलेल्या सिंचन योजना आपल्याही काळात संथच का आहेत? आपण टॅंकर माफियाराजच्या विरोधातले आहात; पण आणखी किती वर्षे येथील जनतेने दुष्काळावर मालामाल होणाऱ्या टॅंकर माफियांचेच खिसे भरायचे, अशा अनेक प्रश्‍नांना आपल्या सरकारकडून उत्तरे हवी आहेत.

हे झाले प्रशासनाचे. आता आपल्या पक्ष संघटनांबाबत सांगायचे तर जसा पक्ष वाढतो तशा कुरबुरी वाढतात, हे येथेही घडते आहे. सोलापूरसारखी हाणामारी नाही; पण गोपीचंद पडळकरांसारखे येथील नेते सध्या भाजपमधील असंतोषाचे जनक ठरले आहेत. त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांबद्दल  केलेली टिप्पणी आपल्यापर्यंत आली असेलच! नवे-जुने असे वादही उफाळत आहेत; पण जनतेला या सर्व राजकारणाचा उबग आल्यानेच त्यांनी येथे परिवर्तन केले. त्यांना हवा आहे नव्या विकासाचा प्रकाश किरण...त्या आशेचा भ्रमनिरास होऊ देऊ नका हीच सांगलीकरांची अपेक्षा!

स्थिती आणि अपेक्षा...

  •     महापालिकेचा विकास आराखडा रखडल्याने सर्व ठप्प
  •     महापालिकेला शंभर कोटींची बक्षिसी मिळाली; पण नियोजन नाही
  •     तिन्ही शहरांच्या विकासासाठी ठोस कार्यक्रम 
  •     महापालिकेकडे चांगल्या अधिकाऱ्यांची वानवा
  •     महापालिकेला पायभूत सुविधांसाठी मोठे पॅकेज हवे
  •     टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांच्या पूर्तीसाठी गती आणि निधी
  •     नव्या महामार्गांची कनेक्‍टीव्हीटी सांगलीला असावी
  •     एक तरी मोठा उद्योग (मदर इंडस्ट्री) पाठवा
  •     वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय, गुन्हेगारीमुक्‍त शहराची अपेक्षा
Web Title: Shekhar Joshi article