महापूर आला, गेला...धडा काय घेतला ?

महापूर आला, गेला...धडा काय घेतला ?

सांगलीला महापूर नवा नाही. हा महापूर म्हणजे २००५ चाच जसाच्या तसा रिटेक आहे. या रिटेकच्या मोजमापासाठी आयर्विन पुलावरील फुटाच्या नोंदीही कमी पडल्या. सन २००५ पेक्षा भयंकर स्थितीचा अंदाज माध्यमे व्यक्त करीत होती. तेव्हा प्रशासन सर्व पातळ्यांवर थंड होते. लोकांचेही ५३.६ फुटांचा जणू करार असल्याप्रमाणेच वर्तन होते. एकूणच प्रशासनासह लोकांनी कृष्णा नदी आणि पावसाला खूपच लाईटली घेतले आणि सारी वाताहत झाली. या अस्मानी संकटाचा वृत्तमालिकेच्या माध्यमातून घेतलेला एक्‍स रे...

आठ ऑगस्टला ही पातळी सर्वोच्च नोंदली गेली होती. त्याला आज १५ दिवस पूर्ण होत आहेत. आणि त्या दिवसाचा तो कहर म्हणजे पूररेषेची नवी क्रांती आणि कृष्णाकाठावरच्या लोकांची चिखल आणि माती करणारा हा दिवस होता. त्यानंतर सारे नुकसान सोसत सांगलीकर पुन्हा जिद्दीने उभे राहताहेत. काही सावरलेत. काहींचा संसार पूर्ण मोडून पडलाय...कोणाचे नुकसान कोटीत,  तर कोणाचे कधीच भरून  न निघणारे आहे, पण या सर्वांना पुन्हा या चिखलातून भरारी घ्यायची आहे, ती फिनीक्‍ससारखी...

पण सांगलीची माती कोणामुळे झाली...फक्‍त निसर्ग हाच येथे खलनायक नाही. या महापुराला अनेक बाजू आहेत. पण महापुराच्या कारणांच्या शोधापेक्षा ज्यांचे बुडाले  त्यांना सावरणे, मदत पोहोचविणे आधी महत्त्वाचे, ही ‘सकाळ’ची भूमिका राहिली आहे. सांगलीच्या मदतीसाठी ‘सकाळ’ कार्यकर्त्याच्या भूमिकेत आला. 

सन २००५ आणि २०१९ मध्ये फरक आहे तो तंत्रज्ञानाचा. गेल्या १५ वर्षांत तंत्रज्ञानाने जी झेप घेतली तेवढी क्रांती यापूर्वी नव्हती. २००५ मध्ये मोबाईलची एवढी क्रांती नव्हती...मोबाईलमधील हवामान दर्शवणारे ॲप सर्वांना आठवडाभर जोरदार पावसाचे संकेत देत होते. हवामान विभागही दुजोरा देत होता, पण या सर्वांकडे यंत्रणांनी एवढे दुर्लक्ष करावे ही सर्वांत मोठी घोडचूक नुकसानीला जबाबदार ठरली. अलमट्टी प्रकल्प हा २००५ च्या महापुरातही खलनायक ठरला होता. तो यावेळी चर्चेत आहे. पण कोयना धरणाची यंत्रणा आणि आपला पाटबंधारे विभाग यांचा जिल्हा प्रशासनाशी समन्वय कसा होता...महापालिकेची यंत्रणा नेमकी संपर्कात कशी होती? आणि या सर्व यंत्रणांनी जनतेला योग्यवेळी सूचना दिल्यात का?

पलूस तालुक्‍यातील ब्रह्मनाळला दुर्घटना घडली...एवढे लोक संकट मागे लागल्यासारखे पळण्यासाठी बोटीत बसले आणि बुडाले...येथे यंत्रणांचे फार मोठे अपयश आहे. सन २००५ च्या पुराशी तुलना पदोपदी होत आहे, पण तेव्हा एकाही माणसाचा जीव गेला नव्हता. सन २००५ च्या वेळी अडवलेले नाले, पूररेषेतील बांधकामे या सर्वांमुळे शहरात पाणी घुसले यावर अभ्यासपूर्ण मांडणी झाली. नवे नियम केले, पण पाच वर्षेच सारे नियंत्रणांत राहिले आणि त्यानंतर पुन्हा हरिपूर रस्त्याच्या बाजूला भल्यामोठ्या इमारती गगनाला भिडू लागल्या. गेल्या महापुरात ज्या माधवनगर रस्त्यावरील व बायपासजवळील ‘मल्टी’ बांधकामांची चर्चा अवैध म्हणून झाली होती.

त्यांच्यावर कारवाई राहू दे पुन्हा  त्याच धोकादायक रेषेवर घरे, शॉपिंग मॉल आणि अगदी आयुक्‍तांचे निवास्थानही उभे राहिले. शहर धोक्‍यात घालून साऱ्याच लक्ष्मणरेषा ओलांडल्या गेल्या...बुजवलेल्या १६ नाल्यांची दंतकथा बनून राहिली. आता कोणाला पटतच नाही की, असे १६ नैसर्गिक नाले होते. त्यापैकी एक उरलाय. तो म्हणजे दररोज आक्रसणारा शेरीनाला. असे अनेक अनर्थ निर्णय महापालिकेने घेत शहराची वाट लावली आणि कृष्णा नदीने या सगळ्याचा चिखल करून टाकला ही अशी एक ना अनेक कारणे या पुरामागे  आहेत.

जेव्हा कधी १५ दिवस असाच पाऊस कोसळेल आणि तेव्हा कोयनेत साठवण क्षमताच नसेल तेव्हा हाच रिटेक होणार आहे. मग आपण तेव्हाही फक्‍त अलमट्टीचा जप किती काळ करायचा ? की काही धडा घेणार? आपला विकास आरखडाच आपण बासनात गुंडाळला तेदेखील एक कारण आहे, हे सर्व मुद्दे हद्दपार करून आपले केरळ होणार किंवा अलमट्टी आपल्याला  बुडवणार अशा काही लॉजिक नसलेल्या भीती घालणे ही आणखी एक घोडचूक ठरेल. सांगलीच्या पेठेतील नुकसान टाळता आला असते का? मग यंत्रणा कुठे कमी पडली. कोट्यवधीच्या नुकसानीला कोण जबाबदार ? महापूर आला, गेला. पण, आपण काय धडा घेतला. यासाठीचा हा शब्दप्रपंच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com