हे पोलिस तर हैवानापेक्षा भयंकर...

शेखर जोशी
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

सांगली जिल्ह्यातील अनिकेत नावाच्या एक संशयित तरुणाचा पोलिस कोठडीतील मृत्यू अस्वस्थ करणारा आणि या सिस्टीमवरचा विश्‍वासच संपविणारा आहे. पोलिसांच्या दृष्टीने हा तरुण आरोपी कसा झाला याची रिॲलिटी चेक कोण करणार? एखाद्याला गुन्हेगार म्हणून थर्ड डिग्री वापरून त्याचा जीव जाईपर्यंत त्याच्याशी खेळणारी वर्दीतली अमानुषता हैवानालाही लाजवणारी आहे. असे मस्तवाल पुन्हा आम जनतेचा आत्मा विकत घेण्याचा प्रयत्न करतात. ‘विक आत्मा, बोल किंमत’ अशा मस्तीत या पोलिसांनी या तरुणाच्या घरी ‘मौत का सौदा’ करण्याचा प्रयत्न केल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. एवढे होऊनही पुढे पुरावे नष्ट केले, सीसीटीव्ही बंद पाडला, मृतदेह जाळला, एक नाही, दोन नाही, हजार गुन्हे एकाच वेळी करणारी ही यंत्रणा पार सडलेली आहे, हे सांगायला कोणती समिती नेमायची गरज नाही. प्रश्‍न असा उपस्थित होतो की याची नैतिक जबाबदारी 
कोणाची...?

देवेंद्रजी,
    आपण गृहखात्याची जबाबदारी स्वतःकडे ठेवून घेतली. त्याला तीन वर्षे झाली. आपले स्मित हास्य आणि क्लीन प्रतिमा जनता सातत्याने दूरचित्रवाणीच्या  चमचमत्या पडद्यावर पाहत असते. सांगलीतील आपल्या पोलिसांच्या सैतानी कृत्याबद्दल अध्येमध्ये कोणाला नाही, जनता तुम्हालाच जाब विचारू इच्छिते! कारण सरकार बदलण्याची प्रक्रिया जनता पार पाडते तेव्हा आदर्श व्यवस्थेची अपेक्षा तुमच्याकडून केलेली असते.

गेले वर्षभर सांगली पोलिसांचे असलेच प्रताप जनतेला अनुभवण्यास मिळताहेत. खरे गुन्हेगार, गॅंगवॉरमधील दादा यांना सापडत नाहीत आणि निष्पापांवर मस्तवाल अधिकाऱ्यांची दादागिरी चालते. बेसिक पोलिसिंग येथे शिल्लकच नाही. गॅंगवॉरसह खुनाच्या मालिका, घरफोड्या, पोलिसांनीच घातलेले दरोडे आणि आता कोठडीतले हे राक्षसी कृत्य म्हणजे महाराष्ट्रात जंगलराज आहे की काय? तुमच्या गृहखात्याच्या खाकी वर्दीच्या कारभाराने कळस गाठला आहे. खाकी वर्दीतले एक अशोक कामटे दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झाले. त्यांच्या कर्तृत्वाचा देशाला अभिमान आहे  आणि या प्रकरणातले हे दिव्य रत्न युवराज कामटेसारखे अधिकारी म्हणजे तुमच्या खात्याने नेमलेले जागोजागीचे घाशीराम कोतवाल आहेत.

काँग्रेसचा आक्रोश एक वेळ विरोधक म्हणून बाजूला  ठेवा; पण या तरुणाच्या मृत्यूनंतर हतबल झालेल्या  त्याची आई... आभाळ कोसळताना पेलणारी पत्नी... या साऱ्यांचा आक्रोश तुम्ही व्हिडिओत पाहा... या एका तरुणासाठी पोलिसांच्या निषेध करणाऱ्या जनतारूपी शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातील राग पाहा... या तरुणाला प्रांजल नावाची एक तीन वर्षांची चिमुरडी आहे. बाबा दूरच्या प्रवासाला गेलेत असं सांगून नातेवाईक तिची समजूत काढताहेत. आहे तुमची हिम्मत या कुटुंबाचं सांत्वन करायची? 

देवेंद्रजी, तुमच्या पोलिसांबद्दल काल लोकांनी दिलेल्या घोषणा ऐका... पोलिसच चोर आहेत, त्यांनाच फाशी द्या, अशा घोषणांनी कोणी विरोधक नाही, आम जनतेने आज आवाज दिला आहे. तुम्ही सत्तेतल्या कटकटी कधी सोडवणार आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगलीतल्या आम जनतेचा कधी विचार करणार? जाग येईल तोपर्यंत कदाचित खाकी वर्दीवरचा उरला सुरला विश्‍वास उडेल, असे या आम जनतेला वाटते आहे. दस्तुरखुद्द आपले आयजी विश्‍वास नांगरे-पाटील यांनीही अशा पद्धतीने पोलिस थर्ड डिग्री वापरू शकत नाहीत, असा निर्वाळा आज दिला आहे. याचीही दखल घ्या... देवेंद्रजी आपले पंतप्रधान मोदीजी सतत स्वच्छ प्रशासनाबद्दल आणि स्वच्छतेबद्दलही संदेश देत असतात; पण या गृहखात्यातील घाणीचे करायचे काय? 

देवेंद्रजी, आम जनतेला आज आपल्याच स्वच्छ प्रतिमेची थोडीफार आशा उरली आहे. आघाडी सरकार आणि  भाजप सरकार यांची सतत तुलना सुरू असते अशीच तुलना करायची झाली आणि आकडेवारी हा तुमचा फार आवडता छंद असल्याने त्यानिशी बोलायचे तर गेल्या वर्षभरात सांगलीच्या गुन्हेगारीने कळस गाठला आहे. ती नियंत्रित करण्यात तर तुमच्या खात्याला यश आलेले नाहीच. उलट वाढली आहे. जरा मागे जाऊन आठवते का बघा... तुमचेच सहकारी एकनाथ खडसे यांनी ते विरोधी पक्ष नेते असताना तेव्हाचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कारभाराची जी चिरफाड केली होती ती राज्याने पाहिली आहे.

खेदाने सांगावे असे वाटते की आर. आर. असताना गुन्हेगारी होतीच त्याच्या कैकपट गुन्हेगारी आजच्या घडीला वाढली आहे. आज आबा असते तर खडसेंपेक्षा वाईट शब्दांत आपल्या गृहखात्यावर टीका केली असती. मुद्दा हा आहे की, पोलिसांवर कोणाचेही नियंत्रण आहे की नाही? सांगलीतील वर्षानुवर्षे ठिय्या मारून बसलेले पोलिस अधिकारी खाकी वर्दीच्या मस्तीत काय काय करताहेत याची जरा गृहखात्याकडून अहवाल मागवून माहिती घ्या. किंवा आपले पालकमंत्री... जाऊ  द्या त्यांना या घटनेची माहिती आहे की नाही हे आधी पहावे लागेल!  चार आमदार एक खासदार भाजपला देऊनही सांगलीसाठी तुम्हाला एक जबाबदार मंत्री मिळू नये याची जनतेलाच लाज वाटते आहे. अशी सगळी सांगलीची अवस्था असताना.

आपल्याला सांगली म्हणजे पश्‍चिम महाराष्ट्रात येत असल्याने येथील जनतेच्या सुख-दु:खाबद्दल जाणून घेण्याची काही तसदी नसावी. पण आज या अनावृत्त पत्रातून तुम्हाला येथील आम जनतेच्या वेदना ऐकून घ्याव्याच लागतील. 

मिरजेत वर्षापूर्वी घडलेली घटना आठवते...? काय झाले या प्रकरणातील दोषी महिला अधिकाऱ्याचे! बढती मिळाली.... एका बलात्कार पीडित निष्पाप महिलेवरच खंडणीचा गुन्हा दाखल करून आपल्या महिला पोलिस अधिकाऱ्याने दिव्य पराक्रम केला. पीडित महिलेने  खाकीवरचा विश्‍वास उडाल्याने चक्‍क स्वत:चा जीव  दिला. तिची छोटी मुलगी अनाथ झाली. तरी तुमच्या नेत्यांना त्या निष्पाप डोळ्यातले आसू दिसले नाहीत. या महिला अधिकाऱ्याचे निलंबन औट घटकेचे ठरले आणि एकदम बढती देण्यात आली. असे हैवान अधिकारी आणखी किती बळींच्या चिता रचणार आहेत, असा  सवाल आम जनतेचा आहे.

आधीच्या सरकारमध्ये  पोलिस नुसते हाप्ते खात होते आता तुमच्या सत्तेत चक्‍क डाके, दरोडे घालू लागलेत. सांगलीतील एलसीबीचे प्रमुख अधिकारी घनवट आणि त्यांच्या टोळीने वारणानगरला तब्बल नऊ कोटींचा डाका घातला. गेले चार महिने सांगली पोलिस ‘चोर-पोलिसचा’ खेळ खेळत होते. अजूनही यातील घनवट नावाचे  महाभाग बडतर्फ केलेले नाहीत....आम जनतेने कोणावर ठेवायचा विश्‍वास? आणखी असे बरेच आहे.

मिरज पोलिसांनी चक्‍क एका कुटुंबाकडे खंडणी मागितली. यातील पाच पोलिस निलंबित केले. सांगली पोलिस ठाण्यातील दोन गुंड पोलिसांनी तर आपल्या टोळ्या तयार केल्या आहेत. त्यांनी फिल्मी स्टाईलने काही दिवासांपूर्वी मारामारी केली. आता या प्रकरणातील तुमचे अधिकारी युवराज कामटे यांच्याबद्दल काय सांगायचे? त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी तर एका किरकोळ गुन्ह्यातील युवकाला अमानुषपणे मारले आणि पुरवा नष्ट करण्यासाठी पलायन वगैरे नाटक रचून त्याचा मृतदेहसुद्धा शिल्लक ठेवला नाही.

आता या प्रकरणातही पोलिस निलंबित झाले आता पुन्हा त्यांची वरिष्ठ अधिकारी चौकशी करतील  आणि पुन्हा एक दिवस ते वर्दी घालून पुन्हा घाशीरामाची कोतवाली पार पाडत राहतील...नुसते अच्छे दिन वगैरे कधी नसतात...पण किमान खाकी वर्दीच्या या जंगलातील नरभक्षकांपासून तरी जनतेला भयमुक्‍त करा, एवढीच अपेक्षा. आता विरोधक म्हणतात तुमचे पश्‍चिम महाराष्ट्रावर प्रेम नाही, ते असो अथवा नसो किमान अटलजींनी सांगितलेला राजधर्म तरी पाळा, एवढीच अपेक्षा!

 shekhar.vjosh@gmail.com

Web Title: Shekhar Joshi writes Letter to devendra fadnavis