शेंद्रेत उड्डाण पुलाच्या बांधकामाला तडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

यामुळे एका मार्गिकेवरची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागठाणे  : पुणे- बंगळूर महामार्गावरील शेंद्रे (ता. सातारा) येथील उड्डाणपुलाच्या बांधकाम दर्जाविषयी आज पुन्हा प्रश्न उभे राहिले. साताऱ्याकडून कऱ्हाडकडे जाणाऱ्या मार्गिकेवर आज खड्डा पडल्यामुळे उड्डाणपुलाखाली सुमारे तीन फूट व्यासाचे कॉंक्रिट तुटून पडले.

महामार्गावर शेंद्रे येथे लाखो रुपये खर्चून मोठा उड्डाण पूल बांधला आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी हा सहापदरी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. गुरुवारी रात्रीपासून या उड्डाणपुलाच्या सातारा ते कऱ्हाड बाजूकडील मार्गिकेवरील खालच्या बाजूचे कॉंक्रिट तुटून पडू लागले. शुक्रवारी सकाळी येथील सुमारे तीन फुटांचा कॉंक्रिट स्लॅबचा तुकडा पडला. त्यामुळे लोखंडी सळ्या उघड्या पडल्या. जागरूक ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर सातारा तालुका तसेच महामार्ग पोलिस, "हायवे हेल्पलाइन' कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तीनपैकी एका मार्गिकेवरची वाहतूक तात्पुरती बंद केली.

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही याच उड्डाण पुलाच्या कऱ्हाड ते सातारा जाणाऱ्या मार्गिकेवर असाच खड्डा पडला होता. या वेळीही पुलाखालील कॉंक्रिट स्लॅब निसटून लोखंडी सळ्या उघड्या पडल्या होत्या. शुक्रवारी नेमके याच्या विरुद्ध बाजूस अगदी पहिल्या खड्ड्यासमोरच आताचा खड्डा पडला आहे. केवळ चार वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी सुरू झालेल्या या उड्डाण पुलाला सहा महिन्यांत दोन वेळा कॉंक्रिट स्लॅब खचून खड्डे पडल्यामुळे पुलाच्या कामाबाबत दर्जाबाबत मोठे प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे.

 

अशीही सामाजिक बांधिलकी

उड्डाण पुलाला भगदाड पडत असल्याचे व कॉंक्रिट स्लॅब कोसळत असल्याची माहिती नागठाणे विभाग पत्रकार संघातील बातमीदारांना समजली. त्यानंतर संभाजी चव्हाण, नितीन साळुंखे, दत्तात्रय क्षीरसागर, सचिन पडवळ या बातमीदारांनी प्रसंगावधान दाखवत याबाबतची माहिती पोलिस अधीक्षक व महामार्ग मदत पथकाला दिली. संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी प्रशासन येईपर्यंत या बातमीदारांसह गौरव साळुंखे (बोरगाव) व रणजित सावंत (लिंब) यांनी सुमारे तासभर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shendre bridge construction question arise again