मेंढपाळांची नव्हे, डॉक्‍टरांची वाडी

Padalkarwadi
Padalkarwadi

कोल्हापूर परिसर हा विविधतेनं नटलेला प्रदेश. वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जपणारी आणि आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अनेक गावं इथं आहेत. अख्ख्या जगात ‘गाव माझं वेगळं’ असं अभिमानानं मिरवणाऱ्या या आगळ्या वेगळ्या गावांविषयी ‘हटके’ माहिती देणारी ही मालिका आजपासून...

आटपाडी तालुक्‍यातील सातशे लोकसंख्येची ही पडळकरवाडी. मेंढपाळांचा शंभरावर उंबरठा. परंपरेने शेळ्या-मेंढ्या पाळायच्या. तोच उपजीविकेचा आधार. पावसाची वाट पाहत ओसाड माळावर काही उगवेल, या आशेवर जगायचे. कैक पिढ्या अशाच गेल्या. अगदी ४०-४५ वर्षांपूर्वी या गावात शिक्षणाचा दिवाही लागला नव्हता; मात्र आता हे गाव शंभर टक्के उच्चविभूषित झाले आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक मूल आता महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. नुसतेच शिक्षण घेत नसून अभियांत्रिकी, वैद्यकीय, नर्सिंग, बी फार्मसी अशा विविध उच्च तांत्रिक विद्याशाखांकडे मुले वळली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिथे शहरी उच्चभ्रूच्या उड्या पडतात, त्या वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे या वाडीतील मुलांचा मोठा ओढा असून गेल्या तीन दशकांत या गावातून विविध पॅथींचे सुमारे साठहून अधिक डॉक्‍टर झाले आहेत. यातले काही जण आज पुणे-मुंबई अशा महानगरांमध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. पन्नास टक्‍के कुटुंबात सध्या एक तरी डॉक्‍टर आहेच.

या बदलाची सुरुवात १९८२ मध्ये झाली. गावातील विद्यार्थी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी दररोज पायी पंचक्रोशीतील मोठे गाव असलेल्या झरे येथे जात असत. त्यावेळची दहावीची बॅच गुणवंतांची होती. या गावात काही विद्यार्थ्यांनी खोल्या घेऊन एकत्रित अभ्यास सुरू केला. यातीलच एक उत्तम पडळकर. त्यांना १९८४ मध्ये बारावीत चांगले गुण मिळाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस.साठी प्रवेश मिळाला.

आज ते आपल्याच पांढरीत म्हणजे आटपाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. उत्तम पडळकर यांच्यापासून प्रेरणा घेत वाडीतील मुले या दिशेने विचार करू लागली. एकापाठोपाठ एक त्यांच्या मार्गावरून जाऊ लागला. अशक्‍यप्राय वाटणारे डॉक्‍टर होण्याचे स्वप्न प्रत्येकाला आवाक्‍यात वाटू लागले. त्यानंतर दरवर्षी एक किंवा दोन-तीन असे विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्राकडे वळू लागले आणि बघता बघता मेंढपाळांची पडळकरवाडी आता डॉक्‍टरांची वाडी झाली. 

आजघडीला गावचे म्हणून सत्तर डॉक्‍टर महाराष्ट्रभरात कार्यरत आहेत. त्यातले पन्नासांवर गावात शिकून डॉक्‍टर झाले आहेत. ते डॉक्‍टर झाल्याने त्यातल्या अनेकांना डॉक्‍टर सौभाग्यवती मिळाल्या. अशा सून म्हणून आलेल्या वीस जणी डॉक्‍टर आहेत. 

डॉक्‍टर झालेल्यांमध्ये केवळ मुले नसून मुलींचीही संख्या मोठी आहे. एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस ते एमडी, एमएस अशा वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या पदव्यांचे ते धनी आहेत. त्यात २५ एमबीबीएस, तर १५ जण पदव्युत्तर (एमडी, एमएस) आहेत. अर्थात ही मंडळी मोठ्या शहरात कार्यरत आहेत. काहींनी तिथे आता मोठी हॉस्पिटल्स उभी केली आहेत. काहींनी मेंदूरोग, हृदयविकार, ऑर्थोपेडिक अशा विद्या शाखांमध्ये प्रावीण्य मिळवले आहे. त्यात पंढरपूरमध्ये संजय व सुनीता पडळकर दाम्पत्य एमडी (मेडिसिन व स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून), मुंबईत प्रवीण पडळकर (अस्थिरोग तज्ज्ञ), सांगलीत रेखा माने (सोनोग्राफीतज्ज्ञ), डॉ. बिरा गोरड (एमडी पॅथॉलॉजिस्ट) कार्यरत आहेत. अशी मोठी यादी सांगता येईल.

डॉक्‍टर घेतात आरोग्य शिबिरे
पडळकरवाडी अत्यंत छोटे गाव आहे. गावात एकही दवाखाना आणि औषधाचे दुकान नाही. ग्रामस्थ उपचारासाठी तीन किलोमीटरवरील झरे गावात जातात. गावच्या डॉक्‍टरांनी एकत्र येऊन मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेतली आहेत. गावात कोणाला वैद्यकीय मदत लागल्यास ती पुढाकार घेऊन केली जाते.

ग्रामीण कथाकार व्यंकटेश माडगुळकर यांच्या बनगरवाडी, माणदेशी माणसं या पुस्तकांनी महाराष्ट्राला माणदेश - आटपाडीची ओळख करून दिली. दुष्काळी वंचितांच्या या कथांमधून, व्यक्तिचित्रांमधून माणदेशाचे अंतरंग उलगडले. या माणदेशातील तालुक्‍याच्या पश्‍चिम टोकाला डोंगराआड वसलेले मेंढपाळांचे पडळकरवाडी. आता या गावाची ओळख डॉक्‍टरांचे गाव अशी झाली आहे. कसा घडला हा बदल?
- नागेश गायकवाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com