शेरीनाल्याच्या ओतात ६५८ बांधकामे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

इदगाह मैदानाजवळील ओतभागात गेल्या काही वर्षांत भराव टाकला जात आहे. डोळ्यादेखत इथे बांधकामे होत होती. त्याबद्दलच्या तक्रारींना आधीच्या सर्व आयुक्तांनी केराची टोपली दाखवली. आता सर्व्हे करून उपयोग काय?
- संजय जाधव, जिल्हा सुधार समिती

सांगली - शेरीनाल्याच्या ओतभागात ६५८ बांधकामे आहेत. त्याचा शोध महापालिका यंत्रणेला नुकताच लागला. त्यासाठी महापूर यावा लागला. आणि मुंबईचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांना आदेश द्यावे लागले. आता या कुटुंबाच्या स्थलांतरासाठी स्वतंत्र प्रकल्प राबवण्याचा संकल्प नूतन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केला आहे.

२००५ च्या महापुरानंतर शहराची पूररेषा बदलण्यात आली. ती ४३.५ फूट इतकी करण्यात आली. त्यावेळी म्हणजे फक्त ६५ बांधकामे या पूररेषेत येत होती. ती हटवली अथवा नाही याबद्दल पालिका प्रशासनाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. आता पूररेषा आणखी विस्तारणार आहे. त्यामुळे या टापूतील बांधकामांची संख्या वाढणार आहे. मात्र विना परवाना झालेल्या बांधकामाची कोणतीच मोजदाद नाही. महापूरकाळात शासनाने परदेशी यांची नियुक्ती केली. त्यांनी शेरीनाल्याच्या ओतभागातील बांधकामांचा सर्व्हे  करण्याचे आदेश दिले. गेल्या आठवडाभरात ते पूर्ण  झाले आणि त्यात ६५८ बांधकामे असल्याचे स्पष्ट  झाले. 

आता ही बांधकामे हटवतानाच त्यांच्या पुनर्वसनाचाही निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले. आता ही सारी प्रक्रिया कशी पार पडणार हे सारे अद्याप स्पष्ट नाही. तथापि शेरीनाल्याचा ओतभाग असलेल्या इदगाह मैदानाच्या परिसरापासून कर्नाळ रस्त्यालगतच्या परिसरात सर्रास भराव टाकला जात असताना प्रशासनाने कधीही कुणाला हटकले नाही. 

जुन्या बुधगाव रस्त्यावरील या अतिक्रमणांबाबत आयुक्तांकडे केलेल्या सर्व तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात आली. हरित न्यायालयाकडेही तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्यालाही प्रशासनाने दाद दिली नाही. आता महापुरानंतर सर्वेक्षण करून  बांधकामाची संख्या शोधण्याने काय हशील होणार? त्यातून एक उपचार पार पडला यापलीकडे काहीही होणार 
नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sherinala Encroachment Illegal Construction