टेंभूच्या पाण्यासाठी शेटफळेचे शेतकरी घेणार जलसमाधी

टेंभूच्या पाण्यासाठी शेटफळेचे शेतकरी घेणार जलसमाधी

आटपाडी : शेटफळे आणि माळेवाडी येथील शेतकरी पैसे भरून टेंभूच्या पाण्याने ओढ्यावरील बंधारे भरून घेण्यासाठी एक महिना संघर्ष करीत आहेत. दोन दिवसापूर्वी सोडलेले पाणी गावच्या वेशीवर येण्याअगोदरच वरिष्ठांच्या आदेशाने आज बंद करून दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना च्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केल्यामुळे शेतकरी संतापले आहेत. कोणत्याही परिस्थितीत उद्या शनिवारी पाणी पुन्हा चालू न केल्यास टेंभूच्या मुख्य कालव्यातून जलसमाधी घेण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे .        

टेंभू योजना सुरू करतानाच शेटफळे आणि माळेवाडीतील शेतकऱ्यांनी ओढ्यावरील बंधारे भरून देण्याची मागणी केली होती. याची रितसर लेखी मागणी करून पाण्याचे पैसे ही अधिकाऱ्यांकडे जमा केले होते. याला एक महिना उलटला तरीही शेतकऱ्यांना पाणी देण्याचे नियोजन केलेले नाही. खासदार संजय पाटील यांच्याकडेही आढावा बैठकीत शेतकऱ्यांनी बंधारे भरून देण्याची विनवणी केली होती. यावेळी अधिकार्‍यांनी पाच दिवसांत पाणी देण्याचे सभेत आश्वासन दिले होते.

काही शेतकऱ्यांनी आमदार अनिल बाबर यांच्याकडे धाव घेऊन अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती. पाण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेकांचे उंबरे झिजवले. अधिकाऱ्यांना विनवणी केली. त्यानंतर काळेवाडी येथील मुख्य कालवा फोडून पाणी सोडले. काळेवाडीतील बंधारे भरून पाणी माळेवाडीच्या शिवेवर आले. तोपर्यंत आज वरिष्ठांच्या आदेशाने पाणी बंद केले. शेटफळेचे तिन्ही बंधाऱ्यात अद्याप पाणी पोचलेले नाही. तोपर्यंतच अचानक पाणी बंद केले.

दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. गावातील जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत. अधिकाऱ्याच्या या खेळाने अनेकांचे संसार रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आली असून,  दुष्काळात मरण्यापेक्षा टेंभूच्या मुख्य कालव्यात उद्या शनिवारी दुपारी दोन वाजता जलसमाधी घेण्याचा निर्णय माणशिंग गायकवाड,गणेश गायकवाड,प्रकाश गायकवाड,महेश जवळे,धनाजी गायकवाड,केशव गायकवाड आदीनी घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com