esakal | शिगाव बंधाऱ्याचा भराव ढासळला शेतकऱ्यांकडून पुनर्बांधणीची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

bandhara

शिगाव बंधाऱ्याचा भराव ढासळला शेतकऱ्यांकडून पुनर्बांधणीची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पेठवडगाव: वारणा नदीवरील शिगाव बंधाऱ्याच्या दक्षिण बाजूचा भराव पूर्णपणे ढासळला आहे. या कामास सुमारे ४८ वर्षे झाली असून त्याची एकदाही डागडुजी केलेली नाही. दोनवेळा आलेल्या पुराच्या दाबामुळे तो ढासळला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याची पुनर्बांधणी लवकरात लवकर केली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

हेही वाचा: 'नेमिष्टे गॅंग 'कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार

वारणा नदीमुळे हातकणंगले व वाळवा तालुक्याचा परिसर सुजलाम्‌-सुफलाम्‌ झाला आहे. चांदोली धरण झाल्यापासून ही नदी बारमाही तुडुंब भरून वाहते. बारमाही पाण्यामुळे उसासह भाजीपाल्याची उलाढाल सुरू आहे. सांगली-कोल्हापूर जिल्ह्याची सीमा या नदीमुळे तयार झाली आहे.

पलीकडे सांगली तर अलीकडे कोल्हापूर जिल्हा सीमा आहे. नदीवर १९७२ ला वारणा सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने शिगाव बंधारा तयार केला आहे. बंधाऱ्याने पाणी अडवून घुणकी, किणी, वाठार, भादोले, पेठवडगाव परिसरास पाणी दिले जाते. यापुढे खोचीजवळ असाच बंधारा आहे.

वारणा नदीच्या या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला दगडी भराव केला आहे. या भरावामुळे आजूबाजूच्या शेातीस संरक्षण मिळते. अनेकवेळा पाणी पात्राबाहेर आल्यास जवळची शेतीची माती खचून नदीचे पात्र वाढत जाते. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. या वर्षी प्रचंड पाऊस झाला. पावसामुळे दोनवेळा भादोले-शिगाव मार्ग बंद झाला.

हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. याशिवाय रस्ता वाहून गेला. भादोलेच्या सीमेपर्यत वारणा नदीचे पाणी आले होते. या पाण्यामुळे शेतीबरोबर गोठा, घरे यांचे नुकसान झाले. त्याप्रमाणे यादरम्यान नदीच्या पात्राजवळील हा भराव पाण्याच्या दाबामुळे खचून पडझड झाली आहे. यापूर्वीचे बांधकाम उत्कृष्ट होते.

हेही वाचा: शॉकने संपवले माऊलीचे जीवन; लेकराचा 'लळा' पाहून गावही हळहळले

परंतु पाण्याचा प्रवाहाच्या दाबामुळे त्याचा टिकाव लागला नाही. तो भराव उखडून इतरत्र पसरला आहे. याचपद्धतीने शिगावच्या बाजूचा भरावाची पडझड झालेली आहे. गणेशमूर्तीचे विसर्जन परिसरातील नागरिक करतात. अनेक वेळा दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही बाजूला घाट बांधणे गरजेचे आहे. याशिवाय ढासळलेल्या भरावाची पुनर्बांधणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे.

हा बंधारा वारणा कारखान्याने अनेक वर्षापूर्वी बांधला आहे. बंधाऱ्याच्या बाजूच्या भिंतीची पूर्ण पडझड झाली आहे. याच्या डागडुजीकडे शासनाने लक्ष दिलेले नाही. त्याच्या दुरुस्तीची मागणी आमदार राजू आवळे यांच्याकडे केली आहे. त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून कामाची पूर्तता करण्याचे आश्‍वासन दिले आहे. भादोलेतील शेतकऱ्यांच्यादृष्टीने हा प्रश्‍न मार्गी लागणे गरजेचे आहे. - अनिल सर्जेराव जामदार, संचालक, वडगाव मार्केट कमिटी, भादोले

loading image
go to top