शिराळा काँग्रेसचे नेते सत्यजित देशमुख यांचं ठरलंय !

शिराळा काँग्रेसचे नेते सत्यजित देशमुख यांचं ठरलंय  !

शिराळा - भाजपच्या महाभरतीत जिल्ह्यातील एक महत्त्वाचे काँग्रेस नेते गळाला लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शिराळा काँग्रेसचे नेते, जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख यांचं ठरलंय, ते रविवारी जनतेला कौल मागणार आहेत. ‘मला तुमच्याशी बोलायचंय’,  असे म्हणत त्यांनी जनसंवाद मेळावा आयोजित केला आहे. रेड येथील ऐश्‍वर्या मल्टिपर्पज हॉलमध्ये दुपारी एक वाजता मेळावा होईल.

विधान परिषदेचे माजी सभापती व सत्यजित देशमुख यांचे वडील शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. तेव्हापासून सत्यजित यांनी भाजपमध्ये यावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यांनी त्याला नकार दिला होता. देशमुखसाहेबांची राजकीय कारकीर्द पाहता जागा बिनविरोध करा, मात्र भाजप प्रवेशाची अट नको, असा प्रस्ताव दिला होता. तो भाजपने अमान्य करत त्या जागी कडेगावच्या पृथ्वीराज देशमुख यांना आमदार केले. तरीही, सत्यजित यांच्या प्रवेशाचा विषय जिवंत राहिला आणि आता त्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

राज्यात अनेक काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गटाचा कौल घेऊन भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. सत्यजित यांनीही तोच पॅटर्न हाती घेतल्याचे चित्र आता समोर आहे. त्यांनी सध्या लोकांना आवाहन करणारी जाहिरात सोशल माध्यमांतून फिरवली आहे. त्यावर शिवाजीराव देशमुख यांचे छायाचित्र असून ‘देशमुख प्रेमी’, असा उल्लेख केला आहे. त्यावर काँग्रेसचा नामोनिशाण नाही. शिवाय, ‘कौल जनतेचा’, असे म्हणत ते आता गटासमोर प्रस्ताव मांडतील. 

भाजप प्रवेश सोमवारी शक्‍य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपची महाजनादेश यात्रेवेळी सोमवारी (ता. १६) ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. अर्थात त्यांचा गट रविवारी काय कौल देतो, यावर पुढचा निर्णय अवलंबून असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com