शिराळ्यात नागप्रतिमेचे पूजन, मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

शिराळा - अनेक वर्षे जिवंत नाग पूजेची परंपरा जोपासणाऱ्या शिराळकरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सलग चौथ्या वर्षी आपल्या उत्साही मनाला मुरड घालत जिवंत नागाऐवजी नागप्रतिमेची पूजा केली. जिवंत नाग पूजा करणारे शिराळकर कशी पूजा करणार याची उत्सुकता सकाळपासून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना व प्रशासकीय यंत्रणेला होती. परंतु अत्यंत संयमाने अंगावर पावसाच्या सरी झेलत हजारो भाविकांच्या उपस्थितीत नागपंचमी साजरी  करण्यात आली.

शिराळा - अनेक वर्षे जिवंत नाग पूजेची परंपरा जोपासणाऱ्या शिराळकरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सलग चौथ्या वर्षी आपल्या उत्साही मनाला मुरड घालत जिवंत नागाऐवजी नागप्रतिमेची पूजा केली. जिवंत नाग पूजा करणारे शिराळकर कशी पूजा करणार याची उत्सुकता सकाळपासून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना व प्रशासकीय यंत्रणेला होती. परंतु अत्यंत संयमाने अंगावर पावसाच्या सरी झेलत हजारो भाविकांच्या उपस्थितीत नागपंचमी साजरी  करण्यात आली.

सकाळी सहा वाजल्यापासून नागमंडळे प्रतीकात्मक नाग घेऊन अंबामाता मंदिरात पूजेसाठी जात होते. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. महिलांनीही अंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. वन विभागाच्या वतीने ‘साप : अंधश्रद्धा व गैरसमज’ या विषयीव भित्तीपत्रकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रबोधन करण्यात आले.

नागपंचमी उत्साहात साजरी करण्यासाठी नागमंडळांनी मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांवर भर दिला होता. यामध्ये धनगरी ढोल, नाशिक ढोल, बेंड यांचा प्रामुख्याने समावेश होता.

दुपारी अडीच वाजता महाजनांच्या घरी नागप्रतिमेची पूजा करून पालखी अंबामाता मंदिराकडे नेण्यात आली. या पालखीचा मान भोई समाजाकडे आहे. शिराळा आगाराच्या वतीने जादा गाड्या सोडण्यात आल्या  होत्या.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ४५० पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर १६ सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.

या वेळी मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर देण्यात आला होता. यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये म्हणून शिराळा आगाराच्या वतीने जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या.

वनविभागाने १६३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. आरोग्य विभागाच्या वतीने पाडळी रोड तळीचा कोपरा, कोकरूड रोड एसटी स्टॅंड, शिराळा बसस्थानक,  यादव हार्डवेअर, नगर पंचायत, व्यापारी असोसिएशन हॉल, मांगले रोड या सात ठिकाणी आरोग्य पथके नेमली होती. विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत वितरणने १० ठिकाणी पथके नेमली होती. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराडे, उपविभागीय पोलिस  अधीक्षक किशोर काळे, मुख्यवनसंरक्षक अशोक  पाटील, उपवनसंरक्षक भारतसिंग हाडा, सागर गवते, विभागीय वनाधिकारी माणिक भोसले, वनक्षेत्रपाल  तानाजी मुळीक, विभागीय माहिती संचालक सतीश लळीत, जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे यांनी भेट देऊन पाहणी केली.

डॉल्बीमुक्त नागपंचमी
शिराळ्यात या वेळी प्रशासनाने डॉल्बी मुक्ती अभियान प्रभावीपणे राबवले. त्यामुळे मिरवणुकीतून डॉल्बीचा दणदणाट गायब झाला. त्याची जागा पारंपरिक वाद्यांनी घेतली. डॉल्बी सांगितलेल्या काही मंडळांनी फक्त दोनच डेक लावल्याने ध्वनिप्रदूषणाचा प्रश्नच आला नाही.

Web Title: Shirala news nagpanchami