पक्ष प्रवेश व बेरजेच्या राजकारणाने रंगत 

शिवाजीराव चौगुले - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

खुल्या गट व गणासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने नेत्यांची तारेवरची कसरत; गुप्त बैठकांना ऊत 

शिराळा - शिराळा तालुक्‍यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे रणांगण पक्ष प्रवेश व बेरजेच्या राजकारणाने तापू लागले आहे. खुल्या गट व गणासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार असून त्या ठिकाणी आपली शक्‍ती वाढावी यासाठी नेत्यांनी फोडाफोडीचे तंत्र आवलंबले आहे. पाठिंब्यासाठी मित्र पक्षांशी गुप्त बैठका वाढू लागल्या आहेत. 

शिराळा तालुक्‍याचे राजकारण हे नेहमी बदलत असते. या ठिकाणी आपल्या सोयीच्या राजकारणाकडे प्राधान्याने पाहिले जाते. येथे निष्ठेपेक्षा प्रतिष्ठेला महत्त्व दिल्याने राजकीय प्रवेशांचे पेव फुटू लागले आहे. त्यातूनच विविध पक्षांत पक्ष प्रवेशाचा घाट घातला जात आहे. एकमेकांचे राजकीय सैनिक पळवण्याची ही लागलेली स्पर्धा म्हणजे एका ठिकाणी खड्डा पडला की तो दुसऱ्या ठिकाणाहून भरून काढणे एवढाच एक उद्योग सुरू झाला आहे. त्यातून मताची टक्‍केवारी वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. 
राष्ट्रवादीतून माजी सभापती उदयसिंगराव नाईक, जिल्हा परिषद सदस्या वैशाली नाईक, रणजितसिंह नाईक, अभिजित नाईक, वीरेंद्रसिंह नाईक, विक्रमसिंह नाईक, शोभाताई नाईक, ऍड करणसिंह चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे सागाव व मांगले जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपच्या टक्‍केवारीत वाढ होणार हे निश्‍चित आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या चरण येथील पंचायत समितीचे माजी सदस्या व नागनाथआण्णा नायकवडी यांच्या शेतकरी चळवळीचे नेते बाळासाहेब नायकवडी, त्यांच्या पत्नी सरपंच सोनाली नायकवडी, त्यांचे ग्रामपंचायत सदस्य यांच्यामुळे राष्ट्रवादीचे शिराळा पश्‍चिम भागात बळ वाढले आहे. गावोगावी आणखी नाराजांना हेरून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहे. 
मनसे, शिवसेना, आरपीआय, भारिप बहुजन पक्ष, बसप, स्वाभिमानी यांसारख्या पक्षांनी सोयीच्या ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ते मित्र पक्ष म्हणून आपल्या प्रवाहात सामील करण्याची रणनीती कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपकडून आखली जात आहे. तशा काही स्थानिक कार्यकर्त्यांशी गुप्त बैठकाही घेण्यास सुरवात करण्यात आली आहे. परंतु मित्र पक्षांनी आम्ही पाठिंबा हवा असल्यास सत्तेत वाटा हवा, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे मित्र पक्षांना आपलंसं कोण करणार की मित्र पक्ष एकत्रित येऊन आपल्या अस्तित्वाची लढाई लढणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

Web Title: shirala politics