"शिरापूर'ला 474 कोटीची "सुप्रमा'

संतोष सिरसट
गुरुवार, 19 जुलै 2018

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्‍याचे हरितक्रांतीचे स्वप्न साकार करणाऱ्या शिरापूर उपसा सिंचन योजनेस जलसंपदा विभागाने आज सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिली आहे. 474 कोटी 51 लाख रुपयांची
"सुप्रमा' दिल्यानंतर या योजनेची कामे दोन वर्षात पूर्ण करण्याच्या
सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्‍याचे हरितक्रांतीचे स्वप्न साकार करणाऱ्या शिरापूर उपसा सिंचन योजनेस जलसंपदा विभागाने आज सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिली आहे. 474 कोटी 51 लाख रुपयांची
"सुप्रमा' दिल्यानंतर या योजनेची कामे दोन वर्षात पूर्ण करण्याच्या
सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते या योजनेच्या कामाची
सुरवात झाली होती. त्यावेळी या योजनेसाठी 90 कोटी 57 लाख रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर एक-दोन वर्ष या योजनेची कामे झाली. मात्र, राज्यातील युतीची सत्ता गेल्यानंतर या योजनेसाठी त्यानंतरच्या आघाडी सरकारने निधीच दिला नाही. त्यामुळे योजनेची कामे रखडली. वेळेत कामे पूर्ण न झाल्यामुळे त्याच्या किमतीत प्रचंड वाढ होत गेली. 2014 मध्ये पुन्हा राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर या योजनेला निधी मिळण्याची आशा निर्माण झाली होती. या योजनेच्या पाण्याची ज्यावेळी चाचणी घेण्यात आली, त्यावेळी वडाळा येथे झालेल्या कार्यक्रमात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लवकरच या योजनेला "सुप्रमा' देण्याचे आश्‍वासन शेतकऱ्यांना दिले होते. त्यांनी दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे आज शासनाने 474 कोटी 51 लाख रुपयांच्या "सुप्रमा'ला मंजूरी दिली आहे. आतापर्यंत यासाठी 100 कोटी 51 लाख रुपये खर्च करण्यातआले आहेत.

या योजनेच्या माध्यमातून उत्तर सोलापूर तालुक्‍यातील 17 गावे व
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्‍यातील दोन गावांमधील 10 हजार
हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. योजनेला "सुप्रमा' देताना अनेक
सूचना दिल्या आहेत. भूसंपादनाच्या खर्चामध्ये 30 टक्के कपात करणे, या
योजनेच्या कामासाठी पुन्हा "सुप्रमा'ला प्रस्ताव दिल्यास संबंधित
अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, तांत्रिकदृष्ट्या शक्‍य असेल तिथे बंदिस्त
नलिका प्रणालीचा वापर करणे, पाणी वापर संस्था स्थापन करणे यासारख्या
सूचना शासनाने दिल्या आहेत.

कामे वेळेत होण्याची आशा
शासनाने "शिरापूर'ला "सुप्रमा' देताना या योजनेची कामे दोन वर्षात पूर्ण
करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षात योजनेची कामे
पूर्ण होऊन तालुक्‍याच्या माळरानावर उजनीचे पाणी फिरेल, अशी आशा
शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

Web Title: shirapur got permission of 474 crore