शिर्डीत महाविकास आघाडीचा जल्लोष!

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

राज्यात सत्ता मिळविल्याचा आनंद साजरा करण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज नेमकी भाजपची सत्ता असलेल्या येथील नगरपंचायतीच्या कार्यालयासमोरील जागा निवडली. 

शिर्डी ः राज्यात सत्ता मिळविल्याचा आनंद साजरा करण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज नेमकी भाजपची सत्ता असलेल्या येथील नगरपंचायतीच्या कार्यालयासमोरील जागा निवडली. 

राज्यात आता आपल्याला पाठबळ देणारे सरकार आले, अशी भावना व्यक्त करीत, आपापल्या पक्षाचे झेंडे नाचवत फटाक्‍यांची आतषबाजी केली. पेढे वाटून एकमेकांचे तोंड गोड केले. दोन दिवसांपूर्वी जेथे भाजपने आपले सरकार येणार म्हणून जल्लोष केला होता, त्याच जागी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. 

विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून लढत देणारे उमेदवार सुरेश थोरात हे या जल्लोषात सामील होण्यासाठी आले होते. शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, सुहास वहाडणे, संजय शिंदे, तसेच "राष्ट्रवादी'चे माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते, सचिन म्हस्के, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे आदींसह शंभराहून अधिक पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते. 

शिवसेनेचे नेते कमलाकर कोते म्हणाले, की महाआघाडीचे सरकार शेतकरी व ग्रामीण भागाला न्याय देणारे असेल. समाजातील वंचित घटकाला न्याय देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातील. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirdi Maha Vikas Alliance is excited!