शिरोली एमआयडीसीतील जी ब्लॉक प्रदूषणमुक्तीकडे

शिरोली एमआयडीसीतील जी ब्लॉक प्रदूषणमुक्तीकडे

नागाव - स्वच्छ, सुंदर आणि घनकचरामुक्त औद्योगिक वसाहतीसाठी शिरोली औद्योगिक वसाहतीतील ‘जी ब्लॉक’ मॉडेल बनत आहे. यामुळे शिरोली औद्योगिक वसाहत प्रदूषणमुक्तीकडे मोठ्या दमदार पद्धतीने वाटचाल करीत आहे. 
मार्च महिन्यापासून औद्योगिक वसाहतीमधील ‘जी ब्लॉक’ येथील उद्योजक स्वच्छ सुंदर आणि घनकचरामुक्त औद्योगिक वसाहतीचे मॉडेल बनवत आहेत.

स्मॅकचे संचालक अमर जाधव यांच्या संकल्पनेतून हा विचार पुढे आला. स्मॅकच्या तेरा संचालकांपैकी तीन संचालक जी ब्लॉकचे प्रतिनिधित्व करतात. यात अध्यक्ष राजू पाटील, शगुन कास्टिंग्जचे शामबाबू तोतला आणि अमर जाधव यांचा समावेश आहे.

राजकारण विरहित सेवा या भावनेतून अमर जाधव यांनी आपली संकल्पना मांडली. त्याला अध्यक्ष राजू पाटील, संचालक शामबाबू तोतला आणि जी ब्लॉक येथील उद्योजकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. ‘जी ब्लॉक’मध्ये सुमारे ४८ कारखाने आहेत. अमर जाधव व राजू पाटील यांनी प्रत्येक उद्योजकाची भेट घेऊन त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. सर्वप्रथम कंपनीच्या भोवतालचा परिसर स्वच्छ होऊ लागला. त्यानंतर कपांऊडच्या भिंती रंगरंगोटी करून आकर्षित दिसू लागल्या, औद्योगिक कचरा व्यवस्थापन नेटके बनले आणि कामगारांमुळे निर्माण होणारा कचरा उचलण्यासाठी शिरोली ग्रामपंचायतीने आठवड्यातून दोन वेळा घंटागाडी सुरू केली. त्यामुळे जी ब्लॉक स्वच्छतेच्या बाबतीत आघाडीवर राहणार आहे. 

ग्रीन औद्योगिक वसाहतीसाठी ही जी ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी औद्योगिक विकास महामंडळ रोपे देईल. सामाजिक सहकार्यातून उद्योजक त्याचे संरक्षण व संगोपन करतील अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन सूरू आहे. 

संघटनांना बळ देण्यासाठी 

स्वच्छ वातावरणात काम केल्याने कामगाराचे आरोग्य निरोगी राहील. यासाठी क्‍लीन आणि ग्रीन औद्योगिक वसाहतीसाठी जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांना बळ देण्यासाठी कामगार संघटना, शेजारील गावातील सामाजिक संस्था, तरुण मंडळे यांनी सहभागी व्हावे. 

काय आहे ‘जी ब्लॉक’? 
नगर पालिका, महानगर पालिका क्षेत्रात ज्या पद्धतीने वॉर्ड (प्रभाग) रचना असते. त्याच पद्धतीने औद्योगिक वसाहतीमधील ‘ब्लॉक’ रचना असते. ‘जी ब्लॉक’मध्ये ४८ कारखाने आहेत. क्‍लीन आणि ग्रीन औद्योगिक वसाहतीचे मॉडेल करताना या ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये स्वच्छता, रंगरंगोटी, वृक्षारोपण, आरोग्य विषयक उपक्रम आदींचा समावेश आहे.

अशी असेल स्वच्छता मोहीम
स्वच्छ, सुंदर आणि घनकचरामुक्‍तीसाठी ‘सकाळ’ आणि औद्योगिक वसाहतींतील संघटना व कारखाने एकत्र येऊन घनकचरामुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी स्वच्छता मोहीम घेणार आहेत. राज्यातील अशा पद्धतीची ही पहिलीच मोहीम आहे. यात शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल फाईव्ह स्टार औद्योगिक वसाहतींमध्ये ४ जूनला अनुक्रमे सकाळी आठ व नऊला स्वच्छता मोहीम होईल. सर्व उद्योजक या दोन तासांत कामगार व कर्मचाऱ्यांना घेऊन परिसराची स्वच्छता करतील. औद्योगिक वसाहतीतील स्वच्छता कायम राखण्यासाठीची सुरवातच या दिवशी होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com