जय भवानीऽऽऽ जय शिवाजीऽऽऽ 

जय भवानीऽऽऽ जय शिवाजीऽऽऽ 

कोल्हापूर - भगव्या पताकांनी सजलेल्या गल्ल्या, शिवचरित्रांवर आधारित वीररसातील पोवाडे, व्याख्याने, कार्यशाळा आणि लक्षवेधी मिरवणुकांनी आज शिवजयंतीला भव्यता लाभली. "जय भवानीऽऽऽ जय शिवाजीऽऽऽ' अशा जयघोषाने सारा आसमंत दुमदुमून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांची समतेची शिकवण असो किंवा त्यांचे पर्यावरणविषयक विचार अशा सर्वच अंगांनी शिवचरित्रातील पैलू विविध उपक्रमांतून उलगडले. साहजिकच उत्सवाच्या भव्यतेला प्रबोधनाची झालरही लाभली. 

छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी साडेनऊ वाजता भवानी मंडपातून शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. बॅंड, घोडेस्वार आणि एकूणच लवाजम्यासह पालखी नर्सरी बागेतील शिवाजी मंदिरात आली. शाहू संगीत विद्यालयाच्या कलाकारांनी शास्त्रीय गायन सादर केले. शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी पोवाड्यातून शिवचरित्र उलगडले. शाहू गर्जना ढोलपथकाने पालखीला सलामी दिली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, यशराजे छत्रपती यांचे आगमन झाल्यानंतर चांदीच्या पाळण्यात शिवपूजन होऊन जन्मकाळ सोहळा झाला. या वेळी इंग्लंडचे एड्रीन मायर, ट्रस्टचे विश्‍वस्त ऍड. राजेंद्र चव्हाण, प्रसन्न मोहिते, प्रणिल इंगळे यांच्यासह विविध तालीम संस्था, मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवाजी चौक, अर्धा शिवाजी पुतळा येथेही विविध संस्था, संघटनांच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन झाले. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासूनच शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले. काल रात्री शिवज्योत आणण्यासाठी शिवभक्त पन्हाळ्याकडे रवाना झाले. पहाटेपासूनच शिवज्योतींचे आगमन होऊ लागले आणि वीररसातील पोवाड्यांनी सारे शहर शिवमय केले. सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी जन्मकाळ सोहळा झाल्यानंतर विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन झाले. सायंकाळी भव्य मिरवणुकांनी उत्सवाची उंची वाढवली. 

सोशल मीडियाही शिवमय 
सोशल मीडियाही आज दिवसभर शिवमय होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांची छायाचित्रे बहुतांश सर्वांच्या व्हॉट्‌स ऍपच्या डीपीवर झळकली; तर शिवचरित्रातील विविध प्रसंगही अनेकांनी शेअर केले. "राजे, तुमच्या आगमनासाठी सजली ही धरणी... गाजवली तलवार, पसरली सातासमुद्रापार कीर्ती' अशी अभिमानगीतेही दिवसभर शेअर होत राहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com