भिडे सन्मान मोर्चासाठी सांगलीत शिव प्रतिष्ठानचे जथ्थे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

आज सकाळपासून सांगली-मिरज रस्त्याच्या दुतर्फा पोलिसांची कुमक दाखल झाली आहे. जागोजागी वाहतूक या रस्त्यापासून वळवण्यात आली आहे. विश्रामबागमधील मध्यवर्ती कल्पद्रुम क्रिडांगणाजवळ, तसेच सांगलीत डॉ आंबेडकर स्टेडीयमजवळ पार्किंग व्यवस्था आहे. तिथूनच कार्यकर्ते पायी मिरज रस्त्याच्या दिशेने दाखल होत आहे.

सांगली : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी आज सांगलीसह राज्यभरात आज मोर्चे आयोजित करण्यात आले आहेत. आज सकाळपासूनच जिल्हाभरातून प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांचे जथ्थे सांगलीच्या चोहाबाजुनी दाखल होत आहेत. भगवे झेंडे आणि गांधी टोप्या या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या ओळखीसह आलेले हे सारे कार्यकर्ते चौका चौकातून शिवरायांचा जयघोष करीत सांगली-मिरज रस्त्याच्या दिशेने येत आहेत. 

आज सकाळपासून सांगली-मिरज रस्त्याच्या दुतर्फा पोलिसांची कुमक दाखल झाली आहे. जागोजागी वाहतूक या रस्त्यापासून वळवण्यात आली आहे. विश्रामबागमधील मध्यवर्ती कल्पद्रुम क्रिडांगणाजवळ, तसेच सांगलीत डॉ आंबेडकर स्टेडीयमजवळ पार्किंग व्यवस्था आहे. तिथूनच कार्यकर्ते पायी मिरज रस्त्याच्या दिशेने दाखल होत आहे. मोर्चात महिला-युवकांचा मोठा सहभाग दिसतो. मोर्चाची सुरवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून होणार असल्याने सध्या या चौक कार्यकर्त्यांनी भरून गेल्याचे दिसून येत आहे. मराठा क्रांती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि आता भिडे सन्मान मोर्चा असे गेल्या दोन वर्षात भव्य मोर्चे निघत असून हा चौकच या मोर्चांचे केंद्रस्थान राहिला आहे. 

स्टेशन चौकापर्यंत हा मोर्चा घोषणा देत जाईल. तिथेच मोर्चाची सांगता होईल. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनाचे जाहीर वाचन होईल. इथे कोणीही भाषण करणार नाही. तिथून सात जणांचे पथक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जाणार आहे. मोर्चासाठी कालपासून पोलिसांची मोठी यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त आहे. राखीव पोलिस दल, शिघ्र कृती दलासह जिल्हा पोलिस दलाचे साडेसातशेंचा फौजफाटा आहे. त्यांच्या सोबतीला फिरते 25 कॅमेऱ्यांची यंत्रणा सज्ज आहे. जिल्हाभरातून प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांचे जथ्थे पायी, वाहनांनी दाखल झाले असून काही मिनिटातच मोर्चाला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Shiv Pratisthan morcha in Sangli