फलटणला शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक लढविणार ः दिवाकर रावते

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

जे कार्यकर्ते चिवटपणे असून, तानाजी मालुसरेंप्रमाणे पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत आहेत त्यांना ताकद दिली जाणार आहे.

फलटण शहर  : ""फलटण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याचा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक लढविणार आहे. उमेदवार कोण हे न पाहता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. फलटण विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकवा,'' असे आवाहन राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. 

येथील नवलबाई मंगल कार्यालयात फलटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी रावते बोलत होते. या वेळी माजी आमदार बाबूराव माने, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, हणमंत चवरे, अमोल आवळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड आदी उपस्थित होते. 

रावते म्हणाले, ""युती शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा जनतेला फायदाच होणार आहे. काही जण कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष असल्यापासून वर्चस्व ठेवून असले, तरी आपले वर्चस्व आता वाढविले पाहिजे. आपला नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व आमदारही झाला पाहिजे, या विचाराने शिवसैनिकाने कामाला लागावे. फलटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद अपेक्षेप्रमाणे मागील काही वर्षांपासून वाढलेली नसली, तरी येथील लोकांच्या मनात हा पक्ष आहे. जे कार्यकर्ते चिवटपणे असून, तानाजी मालुसरेंप्रमाणे पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत आहेत त्यांना ताकद दिली जाणार आहे.

माजी आमदार बाबूराव माने यांनी नेहमी पक्षाचा आदेश मानला आहे, असे सांगत अप्रत्यक्षपणे माने यांच्या उमेदवारीचे संकेत रावते यांनी देत कालावधी कमी आहे. हा मतदारसंघ पिंजून काढा व परिवर्तन घडवा.'' या वेळी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांचे शिवबंधन बांधून दिवाकर रावते यांनी स्वागत केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena candidate to contest Phaltan says Diwakar Rao