उमेदवारीसाठी शिवसेनेची गाडीही हाउसफुल्ल

उमेदवारीसाठी शिवसेनेची गाडीही हाउसफुल्ल

कोल्हापूर - जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा भगवा हाती घेण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे आज मुलाखतीवेळी स्पष्ट झाले. उमेदवारी का हवी, निवडून येण्याचा निकष कसा, किती वर्षे पक्ष संघटनेत काम करता, असे प्रश्‍न प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांना विचारले. गट आणि गणासाठी साडेआठशे जणांनी शिवसेनेला पसंती दिली आहे.

शिवसेना-भाजप युतीची वाट न पाहता सेनेने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. कॉंग्रेसचा हात तसेच राष्ट्रवादीच्या घड्याळाशी संगत न करता आघाडी प्रसंगी स्थानिक आघाडीशी हातमिळवणी करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार यावेळी झाला. जिल्ह्यात शिवसेनेचे तब्बल पाच आमदार असल्याने या पाच जणांना कामाला लावल्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सांगितले.

कळंबा रोडवरील अमृत हॉलमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलाखतींना सुरवात झाली. तत्पूर्वी हाती फाइल, चकचकीत शर्ट आणि पदाधिकाऱ्यांवर छाप पडेल, अशी देहबोली ठेवून जुन्या-नव्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी तयारी केली. साडेअकराच्या सुमारास सभागृह खचाखच भरून गेले. प्रामुख्याने करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी तालुक्‍यांत सेनेची ताकद चांगली आहे.

करवीरमध्ये आमदार चंद्रदीप नरके, हातकणंगलेमध्ये आमदार डॉ. सुजित मिणचेकर, शिरोळमध्ये आमदार उल्हास पाटील, कागलमध्ये प्रा. संजय मंडलिक, संजय घाटगे, राधानगरी-भुदरगडमध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांची ताकद आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही ग्रामीण भागात पक्षवाढीसाठी हक्काची निवडणूक असल्याने शिवसेनेने कंबर कसली आहे. नगरपालिका निवडणुकीत मुरगूडमध्ये मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे प्रा. मंडलिक यांची निर्णायक भूमिका असणार आहे.

करवीरमध्ये आमदार नरके यांची कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याशी थेट लढत असल्याने "करवीर'मध्ये नरके उमेदवारी कोणाच्या पदरात टाकतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. उमेदवार निवडीचे अधिकार सर्वांना असले तरी त्या त्या भागातील आमदार सांगतील, त्यालाच उमेदवारी दिली जाण्याची शक्‍यता आहे.
सर्वप्रथम करवीर तालुक्‍यातील मुलाखतींना सुरवात झाली. करवीरमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने आमदार नरके यांची कसोटी लागणार आहे. कागल, चंदगड तालुक्‍यांतील इच्छुकांची संख्या मोठी आहे.

दुधवडकर, आमदार, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शुभांगी पोवार, बाजीराव पाटील, शुभांगी साळोखे, प्रभाकर खांडेकर, बाजीराव पाटील, एस. आर. पाटील, रिया पाटील आदी उपस्थित होते. बंद खोलीत आमदारांसह प्रा. मंडलिक, दुधवडकर यांनी उमेदवारांची मुलाखत घेतली. निवडणूक का लढविता, मतदारसंघात कामे काय, शिवसेनेत किती वर्षे आहात, असे प्रश्‍न अगदी दोन ते तीन मिनिटांत विचारले गेले. तालुकानिहाय मुलाखतींना सुरवात झाली. दुपारपर्यंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने थांबून होते. यामध्ये महिलांची संख्या मोठी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com