युतीच्या पहिल्याच घासाला सोलापुरात खडा

युतीच्या पहिल्याच घासाला सोलापुरात खडा

सोलापूर -  भाजप-शिवसेना युतीच्या पहिल्याच घासाला सोलापुरात खडा लागला असून,  शिवसेना नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना उघडपणे विरोध दर्शविला आहे. तत्वांशी एकनिष्ठ रहात या भूमिकेवर आपण अखेरपर्यंत कायम राहू
असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

विधानसभा निवडणुकीत सहकारमंत्री श्री. देशमुख भाजपचे उमेदवार असतील तर त्यांना
प्रखर विरोध केला जाईल, अशी पोस्ट त्यांनी व्हायरल केली आहे. त्यांच्या या भूमिकेचे एकनिष्ठ
शिवसैनिक व प्रभागातील त्यांच्या समर्थकांनी स्वागत केले असून, इतर ठिकाणच्या भाजप
उमेदवारांचा निश्चित प्रचार करून युतीचा धर्म पाळला जाईल, अशा प्रतिक्रिया सोशल मिडीयावर
नोंदवल्या आहेत. 

महाराष्ट्र शासनाने सोलापूरच्या हद्दवाढ विकासासाठी 17 कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र या निधीचे वाटप करताना श्री. देशमुख यांनी दुजाभाव केल्याचा श्री. धुत्तरगावकर यांचा आरोप आहे. त्यांनी सुचविलेल्या तीन कोटींची कामे रद्द करून देशमुखांनी स्वतःच्या मर्जीतल्या नगरसेवकांना हा निधी उपलब्ध केला. त्याची कबुली देतानाच, प्रस्ताव द्या तुम्हालाही निधी देऊ, असे सहकारमंत्र्यांनी धुत्तरगावकर यांना सांगितले होते. तेंव्हापासून धुत्तरगावकर समर्थकांनी सहकारमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांचा प्रभाग हा सोलापूर दक्षिण मतदारसंघात
आहे. याच मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व श्री. देशमुख करत आहेत. युती जाहीर झाल्याचा आनंद शिवसेना आणि भाजपचे राज्यातील नेते साजरा करत असताना सोलापुरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. धुत्तरगावकर यांच्या भूमिकेला समर्थन दिल्याने सहकारमंत्र्यांसमोर अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

यांच्या गोटात आनंदी-आनंद
वारंवार अवमान करणाऱ्या भाजपबरोबर युती करू नये अशी सर्वसामान्य व कट्टर शिवसैनिकांची मागणी होती. मात्र नेत्यांनी युती केल्याने त्यानुसारच त्यांची भूमिका असणार आहे. युती झाली तरी सहकारमंत्र्यांना विरोध करण्याच्या धुत्तरगावकर यांच्या भूमिकेमुळे कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसच्या समर्थकांना तर आनंद झालाच आहे, त्याशिवाय पालकमंत्री विजय देशमुख यांच्या समर्थकांमध्येही उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com