शिवसेना नगरसेवकांनीच केली गद्दारी!

विठ्ठल लांडगे
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

""विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड पराभूत झाले. त्यात शिवसेनेच्या काही नगरसेवकांनीच गद्दारी केल्याने राठोड यांना पराभवाचा सामना करावा लागला,'' असा घणाघाती आरोप आता सुरू झाला आहे.

नगर : ""विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड पराभूत झाले. त्यात शिवसेनेच्या काही नगरसेवकांनीच गद्दारी केल्याने राठोड यांना पराभवाचा सामना करावा लागला,'' असा घणाघाती आरोप आता सुरू झाला आहे. त्यामुळे शिवसेना नगरसेवक अस्वस्थ झाले असून, एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत.

शिवसेना उपनेते व पराभूत उमेदवार राठोड यांचे चिरंजीव विक्रम यांच्या नावावर असलेल्या फेसबुक वॉलवर खरमरीत पोस्टद्वारे हा आरोप करण्यात आल्याने त्यास विशेष महत्त्व दिले जात आहे. 

पक्षाच्या ज्या नगरसेवकांनी कामच केलेच नाही, असा संशय आहे, त्यांच्याविषयीचा अहवालदेखील पक्षाचे नगरचे निरीक्षक विलास घुगरे यांच्यामार्फत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून काही कारवाई होते का, याकडे नगरच्या अन्य शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. राठोड यांचा पराभव जिव्हारी लागल्याने रोज त्याबाबत पक्षात मंथन सुरू आहे. स्वत: विक्रम राठोड शिवसैनिकांवरच प्रचंड नाराज असल्याचे बोलले जाते. 

पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले

शिवसेनेच्या कोणत्याही नगरसेवकाने पक्षासोबत गद्दारी केलेली नाही. सर्वच नगरसेवकांनी पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले, तसेच पक्षाच्या नगरसेवकांनी काम न केल्याविषयीचा कोणताही अहवाल श्रेष्ठींकडे पाठविलेला नाही. विधानसभा निवडणुकीत नगरकरांनी पक्षाचे उमेदवार अनिल राठोड यांना भरभरून मते दिलीच आहेत. त्यात विजयासाठी कमी पडलेल्या मतांविषयीचे आत्मचिंतन सुरू आहे. 
- रोहिणी संजय शेंडगे, महापालिका गटनेत्या, शिवसेना 

 राठोड यांच्या पोस्टचा संपादित अंश 

नगर शहराने यापूर्वी हिंदुत्ववादाचे रक्षण करणारा आमदार 25 वर्षे निवडून दिला. त्या वेळचे शिवसैनिक कट्टरच म्हणावे लागतील. स्वार्थाऐवजी त्यांना त्या वेळी फक्त "मातोश्री'चा आदेश महत्त्वाचा वाटला. मात्र, 2019 च्या निवडणुकीत शहर शिवसेनेतच पडलेल्या फुटीमुळे दुर्दैवाने अनिलभैयांना पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेच्याच काही नगरसेवकांनी शिवसेनेचे काम केले नाही म्हणून हा पराभव झाला; परंतु आजही बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहोत. ज्यांनी नगर शहरात शिवसेनेचा पाया रचला, शिवसेनेचे अस्तित्व टिकवले, ज्यांनी कधीही स्वार्थासाठी शिवसेनेशी गद्दारी केली नाही, अशा अनिल राठोड यांना विसरून तुम्ही कधीही मोठे होऊ शकत नाही. नगरमध्ये अनिल राठोड यांचे अस्तित्व कायम राहील. 

कार्यकर्ते चालवतात अकाउंट ः विक्रम राठोड 

याबाबत युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम अनिल राठोड यांना विचारले असता ते म्हणाले, """फेसबुक'वर विक्रम अनिल राठोड नावाने उघडलेले "ते' अकाउंट मी चालवीत नाही. ते आमचे कार्यकर्ते चालवतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्या अकाउंटच्या वॉलवर काय लिहिले आहे, याची मला माहिती नाही. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम कोणी केले आणि कोणी केले नाही, याची सर्वांना माहिती आहे. त्याबाबत आताच बोलणार नाही; योग्य वेळी त्यावर बोलेन. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनीदेखील शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या पराभवाच्या कारणांची माहिती श्रेष्ठींना दिली आहे. त्याचा अहवालदेखील पाठविला आहे. मात्र, त्या अहवालात नेत्यांनी काय लिहिले आहे, याची मला माहिती नाही.''  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena corporators betrayed!