नगरमधील हत्याकांडाला मुख्यमंत्रीच जबाबदार: रामदास कदम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

शिवसेनेच्या दोघांच्या खुनानंतर आज कदम यांच्यासह दिवाकर रावते, दीपक केसरकर येथे आले आहेत. विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असल्याने या घटनेस तेच जबाबदार आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात आरोपीला आणले असताना तेथे हल्ला होतो व आरोपीला पळवून नेले जाते, हे कशाचे लक्षण आहे? असे कधीच घडले नव्हते.

नगर : केडगाव पोटनिवडणुकीच्या कारणावरून शिवसेनेच्या दोघांचा खून झाला. यामागे असलेल्यांना सर्वांनाच अटक झाली पाहिजे. या घटनेस राष्ट्रवादी, कॉंग्रेससह भाजप असे तिघेही जबाबदार असून, उद्या या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे शिवसेनेचे नेते मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. 

शिवसेनेच्या दोघांच्या खुनानंतर आज कदम यांच्यासह दिवाकर रावते, दीपक केसरकर येथे आले आहेत. विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असल्याने या घटनेस तेच जबाबदार आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयात आरोपीला आणले असताना तेथे हल्ला होतो व आरोपीला पळवून नेले जाते, हे कशाचे लक्षण आहे? असे कधीच घडले नव्हते.

पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणारे संघटितरित्या आले होते. त्यामुळे त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कलमान्वये गुन्हा दाखल करावा. तसेच केडगावमधील वातावरणाची माहिती असतानाही सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे व पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्या निलंबनाची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. केडगाव पोटनिवडणुकीत भाजपने नावासाठी उमेदवार उभा केला. त्यांचे लोक कॉंग्रेसचे काम करत होते. त्यामुळे भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीने मिळून शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली. भाजप एकीकडे युती हवी म्हणत असून, दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते संपविण्यासाठी साथ देत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. 

Web Title: Shiv Sena leader Ramdas Kadam criticize Devendra Fadnavis on Kedgaon murder case