उद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत

अभय जोशी
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

पंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या नगरीत होणारी ही सभा ऐतिहासिक आणि न भूतो न भविष्यती अशी होईल, असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (शुक्रवार) येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

पंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या नगरीत होणारी ही सभा ऐतिहासिक आणि न भूतो न भविष्यती अशी होईल, असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (शुक्रवार) येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपुरात जाहीर सभा होणार आहे त्याच्या नियोजनासाठी खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत आज येथे आले होते. या सभेच्या नियोजनाची पाहणी केल्या नंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

श्री राऊत म्हणाले, शिवसेनेच्या राजकारणाला कायमच धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालेले आहे. श्री विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. शरयू च्या तीरावरती जशी श्री ठाकरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली तशीच चंद्रभागेची आरती केली जाणार आहे. शिवसेनेचे अनेक संकल्प आहेत. राम मंदिराबरोबरच महाराष्ट्रात रामराज्य घ्यावे, शिवशाही यावी असे विठुरायाला साकडे घालण्यासाठी श्री ठाकरे हे पंढरपूर येथे येणार असून त्यांची पंढरपूर मधील सभा निश्चितच ऐतिहासिक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काही राज्यात शिवसेना उमेदवारांमुळे भाजपा उमेदवारांचा पराभव झाला याकडे श्री. राऊत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले एखाद्या राज्यात उमेदवार उभा करून भाजपची सत्ता घालवावी या हेतूने शिवसेना लढलेली नाही. शिवसेनेला सुद्धा पक्ष विस्ताराचा हक्क आणि अधिकार आहे देशात आम्हाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पक्ष वाढवायचा आहे त्यामुळे शिवसेनेने काही राज्यात निवडणूका लढवल्या असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नारायण राणे यांच्या भेटीमुळे कोकणात शिवसेनेला धोका होईल का या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले धोका कोणाला.... उलट आमच्यामुळेच बारामती मध्ये त्यांना धोका निर्माण झाला आहे कोकणात शिवसेनेला कोणाचीही भीती नाही असे त्यांनी नमूद केले. शिवसेना आणि भाजपा स्ट्रॅटेजी म्हणून ठरवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात का या प्रश्नावर ते म्हणाले शिवसेना भाजपची अशी कोणतीही स्ट्रॅटेजी नाही. 2019 मध्ये शिवसेना स्वबळावर सत्तेवर येईल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हीच शिवसेनेची स्ट्रॅटेजी आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा शिवाजीराव सावंत जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: shiv sena leader uddhav thackeray rally at pandharpur says sanjay raut