पक्षात सातत्यानं बंड पुकारणाऱ्या आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपद? राजकीय घडामोडींना वेग I Anil Babar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Babar Shiv Sena Eknath Shinde

मतदार संघात विरोधकांसह युतीतील नेत्यांनीही त्यांची सतत कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Anil Babar : पक्षात सातत्यानं बंड पुकारणाऱ्या आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपद? राजकीय घडामोडींना वेग

आटपाडी : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे (Khanapur-Atpadi Assembly Constituency) प्रतिनिधी आणि सातत्याने बंड पुकारत राजकारणात पक्षापेक्षा स्वतःचे वलय निर्माण केलेले आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांना विस्तारात ‘कॅबिनेट’ मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी शक्यता बळावली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडात आघाडीवर असलेले, आमदारकी पणाला लावलेले आणि मतदार संघात विरोधक आणि युतीतील नेत्यांनीच रचलेल्या चक्रव्यूहाशी दोनहात करणाऱ्या बाबर यांनी बंडाचे फळ आणि भविष्यात लढायला बळ मिळू शकते.

सर्वोच न्यायालयच्या निकालानंतर राज्यातील शिंदे-फडवणीस सरकार आता सुरक्षित स्थितीत पोहचले आहे. १६ आमदारांना अपात्र करण्याचा मुद्दा सभापतींच्या कोर्टात आहे. तेथे काय होईल, याबाबत काळ ठरवेल, मात्र सध्या सरकार मंत्रीमंडळ विस्ताराला अनुकुल वातारणात आहे. भाजप आणि शिंदेंचे शिवसेना यातील कोणोकोणाला संधी मिळेल, याबाबत आदमास लावला जात आहे. पुढील आठवडाभरा विस्तार होईल, असे संकेत मिळत आहेत. अनिल बाबर यांचे नाव अर्थातच आघाडीवर आहे.

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी अपेक्षित होती, मात्र काही अनपेक्षित घटना घडल्या आणि ते लांबणीवर पडल्याचे सांगितले जाते. बाबर यांनी सतत बंड करत आपले राजकारण उभे केले आहे. पक्षापेक्षा त्यांचे स्वतःचे संघटन अधिक बलशाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी अनेकदा बंड केले होते. आता शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडात ते पुढे होते. ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या अगदी निकटचे मानले जातात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहे. परिणामी, बाबर यांना बळ द्यावे, यावर दोन्ही बाजूंनी एकमत होईल, असे सांगितले जात आहे.

अनिल बाबर हे ज्येष्ठ आहेत. त्यामुळे त्यांना पहिल्यांदाच मंत्रीमंडळात घेतले जात असले तरी त्यांना कॅबिनेट मंत्रीपदच दिले जाईल, असे सांगितले जात आहे. त्यांच्या वाट्याला खाते कोणते येईल, याबाबत जो-तो आपला अंदाज लावतो आहे. भाजप-शिवसेना युतीत इतक्या सहजासहजी काही ठरणार नाही, इतक्या आधीच त्यांचा फैसला होणेही शक्य नाही. त्यामुळे आधी पद आणि मग खाते, अशी बाबर समर्थकांची भूमिका आहे. मतदार संघात विरोधकांसह युतीतील नेत्यांनीही त्यांची सतत कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. अशावेळी त्यांना बळ मिळण्याची अपेक्षा आहे.