शिवसेनेचे पदाधिकारीच रिंगणात! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रणांगणात शिवसेनेचे पदाधिकारीच उतरले असून, जिल्ह्यातील चौथ्या क्रमांकाचा पक्ष असूनही शिवसेनेने 64 पैकी 54 गट आणि 128 पैकी 108 गणांत उमेदवार उभे केले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रीय पक्ष असूनही कॉंग्रेसला जिल्ह्यातील काही तालुक्‍यांत उमेदवार मिळालेले नाहीत. 

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रणांगणात शिवसेनेचे पदाधिकारीच उतरले असून, जिल्ह्यातील चौथ्या क्रमांकाचा पक्ष असूनही शिवसेनेने 64 पैकी 54 गट आणि 128 पैकी 108 गणांत उमेदवार उभे केले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रीय पक्ष असूनही कॉंग्रेसला जिल्ह्यातील काही तालुक्‍यांत उमेदवार मिळालेले नाहीत. 

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. यापूर्वी हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. पण, या बालेकिल्ल्यात आतापर्यंत शिवसेनेचे दोन आमदार व एक खासदार होऊन गेले. पूर्वी शिवसेनेचे अस्तित्व जावळी, फलटण, माण, कोरेगाव, पाटण या तालुक्‍यांमध्येच होते. त्यानंतर प्रत्येक तालुक्‍यात सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उभे राहिले. तशी शिवसेनेची ताकद जिल्ह्यात आंदोलनापुरती दिसून येत असे. परंतु, त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अपार श्रध्दा असलेले होते. त्यामुळे त्यांनी इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणे टाळले. तसेच जिल्ह्यातील आनंदराव अडसूळ, डॉ. श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार, गजानन बाबर हे माजी खासदार, तर एकनाथ शिंदे हे विद्यमान बांधकाम मंत्री आहेत, तर दगडू सपकाळ, बाबूराव माने, बाळासाहेब साळुंखे हे जिल्ह्याबाहेर शिवसेनेचे आमदार झाले. परंतु, त्यांचे लक्ष जिल्ह्यावर होते. मध्यंतरी दगडू सपकाळ यांनी जावळीतून उमेदवारी केली. दोन्ही कॉंग्रेसच्या लढाईत मात्र, शिवसेना नेहमी "बॅकफुट'वर राहिली. पण, यावेळेस जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मात्र, शिवसेनेने चांगलीच मुसंडी मारली आहे. कॉंग्रेसपेक्षा अधिक जागांवर उमेदवार उभे करून आघाडी घेतली आहे. शिवसेनेने 54 गट आणि 108 गणांत उमेदवार उभे केले आहेत. त्यामध्ये पदाधिकारी रिंगणात आहेत. यामध्ये जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे खेड गट, मल्हारपेठ गटातून हर्षल कदम, एकंबे गणातून मालोजीराजे भोसले, कुडाळ गणातून प्रशांत तरडे, माजी पदाधिकारी हणमंत चवरे लिंब गटातून, तर रणजितसिंह देशमुख यांची पत्नी निमसोड गणातून रिंगणात आहेत. 

या गट, गणांत मिळाले नाहीत उमेदवार 

शिवसेनेला आंधळी, पुसेसावळी, कुकुडवाड, पाल, सैदापूर, तांबवे, बावधन, पाटखळ, कारी, मायणी या दहा गटांत उमेदवार मिळालेले नाहीत. तर ल्हासुर्णे, पुसेसावळी, म्हसुर्णे, साप, सैदापूर, तांबवे, मल्हारपेठ, नाडे, गिरवी, विंग, सस्तेवाडी, येळगाव, कोळकी, सवादे, विडणी, शिवथर, सुरवडी, कुरोली, मायणी, कलेढोण या गणांत उमेदवार मिळालेले नाहीत.

Web Title: Shiv Sena office bearers in election