सई नको स्मृतीला 'ब्रॅंड अँबॅसडर' बनवा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

सांगली : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महापालिकेच्या स्वच्छ सांगली अभियानासाठी ब्रॅंड अँबॅसडर म्हणून निवडलेल्या अभिनेत्री सई ताह्मणकरच्या नावाला शिवसेनेने विरोध दर्शवून आज निदर्शने केली. सईऐवजी स्वकर्तृत्वावर जागतिक कीर्तीवर सांगलीचे नाव झळकवलेल्या स्मृती मानधनाची ब्रॅंड अँबॅसडर म्हणून निवड करावी, अशी जोरदार मागणी केली. 

सांगली : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महापालिकेच्या स्वच्छ सांगली अभियानासाठी ब्रॅंड अँबॅसडर म्हणून निवडलेल्या अभिनेत्री सई ताह्मणकरच्या नावाला शिवसेनेने विरोध दर्शवून आज निदर्शने केली. सईऐवजी स्वकर्तृत्वावर जागतिक कीर्तीवर सांगलीचे नाव झळकवलेल्या स्मृती मानधनाची ब्रॅंड अँबॅसडर म्हणून निवड करावी, अशी जोरदार मागणी केली. 

स्वच्छ सांगली अभियानासाठी सई ताह्मणकरची निवड केली आहे. तिच्याबरोबर सहकलाकार म्हणून काम करण्यासाठी इच्छुक कलाकारांचे 'ऑडिशन' आज दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होते. ऑडिशन सुरू असतानाच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाट्यगृहासमोर जमले. त्यांनी निदर्शने केली. अभियानासाठी ब्रॅंड अँम्बॅसडर म्हणून निवडलेल्या सईच्या नावाला विरोध केला. तिच्याऐवजी क्रिकेटपटू स्मृती मानधना हिची निवड केल्यास युवा पिढीसमोर चांगला आदर्श ठेवला जाईल. 

महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी सर्वप्रथम रस्ते, स्वच्छ पाणी, ड्रेनेज, सुलभ स्वच्छतागृह, पथदिवे आदी सुविधा चांगल्याप्रकारे द्याव्यात. सांगलीला ब्रॅंड अँम्बॅसडर बनवत असताना सांगली ब्रॅंड व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. सर्व सुखसुविधा द्या आणि मगच सांगली ब्रॅंड आहे असे वाटले तर ब्रॅंड अँम्बॅसडर बनवा. सांगलीवर चित्रफीतच बनवणार असाल, तर प्रशासनाने हिंमत असेल तर कचऱ्याचे ढिग, मोकाट कुत्री, डुकरे, गाढवे, रस्त्यावरील खड्डे, तुंबलेल्या गटारी यांचे चित्रण करावे. साथीच्या रोगांनी बळी पडलेल्या व्यक्तींच्या शोकाकुल कुटुंबाचे व परिस्थितीचे चित्रीकरण करावे. नागरिकांना सर्वप्रथम चांगली सेवा द्या, अन्यथा जनतेच्या पैशावर उधळपट्टी करणाऱ्या कार्यक्रमाला विरोध करू. प्रसंगी कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.

तसेच सोमवारी आयुक्तांच्या घरासमोर निदर्शने करण्याचा इशारा दिला. 

दरम्यान, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आमदार मोहनराव कदम यांना भेटून निवेदन दिले. आमदार कदम यांनी 3 जानेवारीचा कार्यक्रम रद्द करण्यास सांगू, असे आश्‍वासन दिले. उपजिल्हाप्रमुख अजिंक्‍य पाटील, अनिल शेटे, प्रसाद रिसवडे, दिलीप शिंदे, ओंकार देशपांडे, अविनाश कांबळे, ऍड. संजय इंजे, सतीश मालू, प्रशांत पवार, प्रा. नंदकुमार सुर्वे आदी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena opposes Sai Tamhankar as brand ambassador for Swacch Maharashtra Campaign