बागल गटाची सत्ता संपुष्टात शिवसेनेचा कालखंड सुरू 

अण्णा काळे
बुधवार, 15 मार्च 2017

करमाळा - करमाळा पंचायत समितीवर असलेली बागल गटाची सत्ता संपुष्टात आली असून करमाळा पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे शेखर गाडे व उपसभापतिपदी शिवसेनेचेच गहिनीनाथ ननवरे यांची बिनविरोध निवड करत आमदार नारायण पाटील यांनी पंचायत समितीची सूत्रे हाती घेतली आहेत. 

करमाळा - करमाळा पंचायत समितीवर असलेली बागल गटाची सत्ता संपुष्टात आली असून करमाळा पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे शेखर गाडे व उपसभापतिपदी शिवसेनेचेच गहिनीनाथ ननवरे यांची बिनविरोध निवड करत आमदार नारायण पाटील यांनी पंचायत समितीची सूत्रे हाती घेतली आहेत. 

करमाळा पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचे आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यात युती झाली. शिवसेना-कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडी अशी तिरंगी लढत झाली. या तिरंगी लढतीत शिवसेनेचे सहा, कॉंग्रेसचा एक व कॉंग्रेसपुरस्कृत एक, अशा आठ जागा शिवसेना-कॉंग्रेसला मिळाल्या. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले. करमाळा पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने अनुसूचित जातीतील एकमेव निवडून आलेले शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांचे समर्थक शेखर गाडे हे सभापती होणार, हे निश्‍चित होते. मात्र उपसभापती कोण होणार, याची मोठी उत्सुकता सर्वांनाच लागली होती. सकाळी नऊपर्यंत उपसभापती कोण होणार, हे नक्की नव्हते. मात्र गहिनीनाथ ननवरे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. उपसभापतिपद कॉंग्रेसला मिळावे, अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची होती. त्यांनी मंदाकिनी लकडे याच्या नावाचा आग्रह धरला होता. अपक्ष राहुल सावंत हेही उत्सुक होते. तर आमदार नारायण पाटील यांचे पुतणे डबल उपमहाराष्ट्र अतुल पाटील, साडेच्या जया जाधव यांच्याही नावांची चर्चा होती. त्यामुळे उपसभापतिपदाची संधी कोणाला मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. काही घडामोडीनंतर उपसभापती पदासाठी शिवसेनेचे वीट गणाचे उमेदवार गहिनीनाथ ननवरे यांचे नाव सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी निश्‍चित करण्यात आले. सभापती शेखर गाडे हे एक नावाजलेले पहिलवान आहेत. केमचे माजी सरपंच अजित तळेकर यांना केम गणातील उमेदवार निवडीचे अधिकार आमदार नारायण पाटील यांनी दिले होते. त्यामुळे अजित तळेकर यांचीही भूमिका करमाळा पंचायत समितीचा सभापती ठरवण्यात महत्त्वाची ठरली. उपसभापती गहिनीनाथ ननवरे हे उच्चशिक्षित आहेत. त्यांना पहिल्यांदा उपसभापतिपदाची संधी मिळाली आहे. 

आठही सदस्यांना मिळणार संधी 
करमाळा पंचायत समितीचे नूतन सभापती व उपसभापती निवडीनंतर बोलताना आमदार नारायण पाटील म्हणाले, जनतेने बागल गटाच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून व विकासकामांची दखल घेत शिवसेना-कॉंग्रेसच्या ताब्यात पंचायत समितीची सत्ता दिली आहे. आमच्याकडे असलेल्या आठही पंचायत समितीच्या सदस्यांना सभापती व उपसभापती पदाची संधी दिली जाणार आहे. शेखर गाडे हे पहिली अडीच वर्षे सभापती असणार आहेत, तर उपसभापतीचा कार्यकाळ प्रत्येकी एक वर्षाचा असेल आणि पुढील अडीच वर्षांत सभापतिपद मात्र सव्वा सव्वा वर्ष दोघांना दिले जाईल. अशा पद्धतीने पाटील व जगताप गटाच्या आठही सदस्यांना सभापती व उपसभापती पदाची संधी दिली जाणार आहे. 

Web Title: Shiv Sena period starts