सातारा जिल्ह्यात शिवसेना बांधणीला वेग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

सातारा - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने जोरदार बांधणी सुरू केली असून, आता विधानसभा मतदारसंघनिहाय मेळाव्यांचे नियोजन केले आहे. या मेळाव्यांत पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हा संपर्क प्रमुख गजानन कीर्तिकर, सातारा- सांगलीचे संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे- पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून उमेदवारांची चाचपणी करणार आहेत. 

सातारा - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने जोरदार बांधणी सुरू केली असून, आता विधानसभा मतदारसंघनिहाय मेळाव्यांचे नियोजन केले आहे. या मेळाव्यांत पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हा संपर्क प्रमुख गजानन कीर्तिकर, सातारा- सांगलीचे संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे- पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून उमेदवारांची चाचपणी करणार आहेत. 

स्वबळावर लढण्याचा निर्णय झाल्यानंतर शिवसेनेने जिल्ह्यामध्ये बूथनिहाय बांधणी केली. प्रत्येक ठिकाणी बूथ प्रमुखांची नियुक्ती केली. आता या बूथ प्रमुखांच्या मेळाव्यांच्या माध्यमातून आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीची बांधणी होणार आहे. त्यासाठी 11 व 12 जुलैला प्रत्येक दोन विधानसभा मतदारसंघाचे मेळावे होतील. या मेळाव्यांत पालकमंत्री विजय शिवतारे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख गजानन कीर्तिकर, सातारा- सांगली संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे- पाटील हे बूथ प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यांतूनच विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे. मुळात पालकमंत्री शिवतारे यांनी आजपर्यंत संघटना बांधणीसाठी फारसे लक्ष घातलेले नाही. त्यामुळे आता ते या मेळाव्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात सक्रिय होणार आहेत. शिवसेनेची ताकद जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी त्यांचे हर्षद कदम, चंद्रकात जाधव, राजेश कुंभारदरे यासाठी प्रयत्नशील आहेत; पण या सर्वांना शिवसेनेच्या मंत्र्यांसह नेत्यांची साथ मिळणे आवश्‍यक आहे. 

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यावेळेस स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यात बूथ समित्यांची स्थापना आणि बूथ प्रमुखांची नेमणूक विधानसभा मतदारसंघनिहाय करण्यात आली. आता या बूथ प्रमुखांच्या मेळाव्यांच्या माध्यमातून शिवसेनेची ध्येय, धोरणे आणि आगामी निवडणुकीतील भूमिका मांडली जाणार आहे. त्यामुळे आठही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवारांविरोधात शिवसेनेचा ही सक्षम उमेदवार दिला जाणार आहे. त्याची चाचपणी आता होणार आहे. 

Web Title: Shiv Sena Preparation in Satara district