शिवसेनेचे नगरसेवक गैरहजर राहणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

कोल्हापूर - महानगरपालिकेच्या महापौर निवडीत शिवसेनेचे चारही नगरसेवक गैरहजर राहतील, ही पक्षाची भूमिका आहे. ज्या भाजपबरोबर ताराराणी आघाडीचे संस्थापक माजी आमदार महादेवराव महाडिक आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही कधीच युती करणार नाही, असा पक्षाचा निर्णय असल्याचे आज संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोल्हापूर - महानगरपालिकेच्या महापौर निवडीत शिवसेनेचे चारही नगरसेवक गैरहजर राहतील, ही पक्षाची भूमिका आहे. ज्या भाजपबरोबर ताराराणी आघाडीचे संस्थापक माजी आमदार महादेवराव महाडिक आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही कधीच युती करणार नाही, असा पक्षाचा निर्णय असल्याचे आज संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांबरोबर आम्ही केव्हाच युती केली नाही, करणारही नाही. हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचीही शिकवण आहे. 
भाजपने कोल्हापुरात माजी आमदार महाडिक यांच्या काँग्रेसप्रणीत ताराराणी आघाडीशी युती केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही हा कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा आदेश घेऊन हा दूत येथे आला असल्याचेही श्री. दुधवडकर यांनी सांगितले. 

महाडिक यांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले आहे, त्यामुळे ते आता काँग्रेसचे राहिलेले नाहीत, तरीही ते काँग्रेसचे कसे समजता. यावरून  ताराराणी आघाडी त्यांची आहे आणि ते काँग्रेसचेच म्हणून ओळखले जातात. भाजप त्यांच्याबरोबर आहे म्हणूनच आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही, ही आमची भूमिका महापौर निवडीतही कायम राहणार आहे.

आर्थिक घडामोडीतून तुमचे नगरसेवक तटस्थ भूमिका घेतात अशी चर्चा आहे, यावर श्री. दुधवडकर म्हणाले,

‘‘आर्थिकच मुद्दा असता तर आम्हाला बरेच काही करता आले असते, मात्र आम्ही तसे करणार नाही. पक्ष निष्ठा, पक्षाची ध्येय धोरणे यापासून आम्ही बाजूला जाणार नाही म्हणून ही भूमिका आहे. तरीही कोणी त्याला आर्थिक मुद्दा जोडत असेल तर त्यापुढे आम्ही काय बोलू शकणार नाही.’’ सध्या महापालिकेत तुमच्या नगरसेवकांना ना ‘मान’ आहे ना ‘धन’ आहे? ज्यांनी त्यांना निवडून दिले त्यांना तुमच्या भूमिकेबद्दल काय वाटेल, त्यांच्या प्रभागाचा विकास कसा होणार या प्रश्‍नावर श्री. दुधवडकर म्हणाले,‘‘विधान परिषदेच्या आमदारांच्या निधीतून आम्ही नगरसेवकांच्या भागातील विकास करू, लोकांनी मोठ्या आशेने त्यांना निवडून दिले आहे. त्यांचा भ्रमनिरास होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. त्यांना स्थायी समितीवेळी नक्कीच ‘मान’ मिळणार आहे, ते तुम्ही लवकरच पहाल.’’

भाजपने किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी तुम्हाला महापौर निवडीत सहकार्य करण्यासाठी निमंत्रण दिले आहे काय? यावर श्री. दुधवडकर म्हणाले, ‘‘आम्हाला कोणीही निमंत्रण दिलेले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करणे हे पक्षाच्या धोरणात बसत नाही त्यामुळे त्याचा प्रश्‍नच नाही. आणि भाजपबरोबर माजी आमदार महाडिक असल्यामुळे त्यांच्याबरोबर आम्ही जाणारच नाही. म्हणून आम्ही महापौर निवडीत नगरसेवकांना गैरहजर राहण्याचे आदेश दिले आहेत.’’

काही दिवसापूर्वीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाआघाडी महापौर निवडीत ही कायम राहिली असे सांगितले होते, यावर श्री. दुधवडकर म्हणाले, ‘‘आघाडीबाबत पालकमंत्री बोलले आहेत. ती त्यांची भूमिका असेल. आमची भूमिका आजही कायम आहे पुढेही कायम राहील.’’

या वेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, नगरसेवक राहुल चव्हाण, अभिजित चव्हाण, महेश उत्तुरे उपस्थित होते. गट नेता नगरसेवक नियाज खान प्रकृती बिघडल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.

स्थायी समितीत पाहू या 
महापौर निवडीनंतर स्थायी समितीची निवडणूक २० डिसेंबरला होत आहे. तेथे एक मतासाठी राजकारण होणार आहे. तेथे आम्ही आमची ताकद दाखवू. शिवसेनेच्या नगसेवकांना काय ‘मान’ आहे ते तेथे दाखवून देऊ. शिवसेनेचे चार नगरसेवक म्हणजे चारशे जणांसारखे आहेत, असे सांगून दुधवडकर यांनी स्थायी समिती सभापती निवडीवेळी शिवसेनेकडून चमत्कार दाखविण्याचे संकेत दिले. यासाठी स्वतः मी कोल्हापुरात हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगून घडामोडीवर ते नियंत्रण ठेवणार असल्याचेही संकेत दिले.

Web Title: Shiv Sena will be absent councilors