खानापूरला 13 पैकी 9 गावात शिवसेनेचा भगवा 

Shiv Sena wins in 9 out of 13 villages in Khanapur
Shiv Sena wins in 9 out of 13 villages in Khanapur

विटा (जि. सांगली) : खानापूर तालुक्‍यातील अकरा ग्रामपंचायतींच्या निकालात आमदार अनिल बाबर गटाने बाजी मारत नऊ ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला. तर पोसेवाडी, शेडगेवाडी आणि भिकवडी बुद्रुक येथे माजी आमदार सदाशिव पाटील गटाने राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. मंगरूळ येथे ज्येष्ठ नेते रामरावदादा पाटील यांनी सत्ता अबाधित ठेवत गड राखला.

तालुक्‍यातील तेरा ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. निवडणुकीपूर्वी तांदळगाव व भडकेवाडी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर पारे येथे सात जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित चार जागांसाठी निवडणूक झाली. अकरा ग्रामपंचायतींसाठी चुरशीने 76.61 टक्के मतदान झाले होते. आज येथील शासकीय गोदामात मतमोजणी पार पडली. प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली. 

एकूण अकरा टेबलवर मतमोजणी प्रक्रिया झाली. प्रत्येक ग्रामपंचायतीचा वार्डनिहाय निकाल घोषित करण्यात आला. सकाळी अकरापर्यंत मतमोजणी पूर्ण झाली. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि जल्लोष करीत विजयोत्सव साजरा केला. तालुक्‍यातील रेणावी, पारे, माहुली, खंबाळे (भा), तांदळगाव, मेंगाणवाडी, भडकेवाडी, नागेवाडी व देविखिंडी येथे शिवसेनेने भगवा फडकवला. 

माहुलीत सत्तांतर होऊन पुन्हा एकदा आमदार अनिल बाबर समर्थकांची सत्ता आली. 
नागेवाडी येथे चुरशीमुळे निवडणूक निकालाची उत्सुकता होती. नागेवाडीत सात विरुद्ध दोन फरकाने आमदार बाबर गटाने बाजी मारली. 

खंबाळे (भा.) येथे जय हनुमान विकास पॅनेलने विजय मिळवत नऊ विरुद्ध शून्य असा विरोधकांचा पराभव केला. रेणावी येथेही चुरशीने लढत झाली. या ठिकाणी पाच उमेदवार सत्ताधारी आमदार बाबर समर्थक तर चार उमेदवार राष्ट्रवादी पुरस्कृत विरोधी गटाचे विजयी झाले. या ठिकाणी सत्ता राखण्यात बाबर गटाला यश आले. 
पारे येथे आमदार बाबर समर्थक सात उमेदवार यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले होते. उर्वरित चार जागांवर विजय मिळवत बाबर गटाने निर्विवाद सत्ता मिळवली.

मेंगाणवाडीत शिवशक्ती ग्रामविकास पॅनेलने चार जागा जिंकून सत्ता मिळवली. तर विरोधी शिवशंकर पॅनेलला तीन जागा मिळाल्या.  भिकवडी(बु.) येथे सात जागांवर विजय मिळवत माजी आमदार सदाशिव पाटील समर्थकांनी बाजी मारली. पोसेवाडी येथे माजी आमदार सदाशिव पाटील समर्थकांनी सर्व सातही जागांवर विजय मिळवत सत्तांतर घडवले. या ठिकाणी सत्ताधारी शिवसेना समर्थकांना खाते उघडता आले नाही. शेडगेवाडी येथेही सहा जागांवर विजय मिळवत माजी आमदार सदाशिव पाटील समर्थकांनी विजय मिळवला तर विरोधी शिवसेना समर्थकांना एक जागा मिळाली. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि जल्लोष करीत विजयोत्सव साजरा केला. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com