कायदेशीर प्रक्रियेसाठी शिवपुतळा तासगाव नगरपरिषदेला परत देणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

तासगावमधील गुरुवार पेठेतील रस्त्यावर नगरपालिकेच्यावतीने अश्‍वारुढ पुतळा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील आधीचा पुतळा नगरपरिषदेकडे सैनिक शाळेकडे सोपवला होता. त्या पुतळयाशेजारी दादोजी कोंडदेव व संत रामदास यांची म्युरल्स बसवण्यात आली.

सांगली : तासगाव येथील गुरूवर्य दादोजी कोंडदेव सैनिक शाळेकडे नगरपरिषदेकडून हस्तांतरीत केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परत घ्यावा अशी विनंती सांगली शिक्षण संस्थेच्यावतीने नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हस्तांतरणाची कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर पुतळा परत स्विकारण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे. संस्थेचे कार्यवाह सतीश गोरे यांनी हे निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. 

तासगावमधील गुरुवार पेठेतील रस्त्यावर नगरपालिकेच्यावतीने अश्‍वारुढ पुतळा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील आधीचा पुतळा नगरपरिषदेकडे सैनिक शाळेकडे सोपवला होता. त्या पुतळयाशेजारी दादोजी कोंडदेव व संत रामदास यांची म्युरल्स बसवण्यात आली. त्याला संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतानाच पुतळा हस्तांतरणाची प्रक्रिया कायदेशीर नसल्याच्या मुद्यावरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ती ही शिल्पे तातडीने हटवावीत अशी मागणीही संस्थेकडे केली आहे. 

संस्थेच्या संचालक मंडळाने काल तातडीने बैठक घेऊन याबाबतची भूमिका स्पष्ट करणारे निवेदन नगरपरिषदेकडे पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, 
पुतळा हस्तांतरीत करताना नगरपरिषदेने ठराव क्रमांक 111 (ता.5 ऑगस्ट 2017) केला होता. त्यावेळी सर्व कायदेशीर पूर्तता नगरपरिषदेने केली असल्याचे गृहित धरण्यात आले होते. महाराजांच्या पुतळ्याचे योग्य जतन करण्याच्या हेतूने संस्थेने पुतळा स्विकारला होता. परंतु शासन पूर्व परवानगी न घेतल्याचे कारण दर्शवून कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात आणण्याचे प्रयत्न काहींनी चालविले आहेत. ते शैक्षणिक वातावरणास व विद्यार्थी हितास योग्य नाही. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्वतंत्र पत्रव्यवहार करून पुतळा परत ताब्यात घेण्याबाबत विचार करण्यात येईल. तोपर्यंत कोणताही अनावश्‍यक प्रसंग ओढवू नये, विद्यार्थी सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून आम्ही सदर पुतळा आपणाकडे परत सोपवत आहोत. '' 

Web Title: Shivaji Maharaj statue at tasgaon