शिवाजी मार्केट वर्षानुवर्षे अस्वच्छतेत 

डॅनियल काळे 
गुरुवार, 11 एप्रिल 2019

कोल्हापूर  येथील छत्रपती शिवाजी मार्केटची अवस्था दयनीय अशी आहे. साफसफाई नाही, रंगरंगोटी नाही, की देखभाल दुरुस्ती नाही. येथे प्रवेश केला, की गलिच्छपणा जाणवतो.

कोल्हापूर - येथील छत्रपती शिवाजी मार्केटची अवस्था दयनीय अशी आहे. साफसफाई नाही, रंगरंगोटी नाही, की देखभाल दुरुस्ती नाही. येथे प्रवेश केला, की गलिच्छपणा जाणवतो. या मार्केटमध्ये जायचे तरी कसे? कारण मार्केटमध्ये जाणाऱ्या लोकांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागाच नाही. 

छत्रपती शिवाजी मार्केटपूर्वी फेरीज मार्केट नावाने ओळखले जात होते. 1976 पासून या मार्केटच्या पुनर्बांधणीला सुरवात झाली. दोन वर्षांत काम पूर्ण झाले. मार्केटचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक व्यवसाय एकाच ठिकाणी आहेत. कांदा, बटाटा मार्केट, भाजीपालापासून ते विविध दुकाने आणि व्यवसाय या मार्केटमध्ये आहेत. पूर्वी या मार्केटमध्ये ग्राहकांचा लोंढाच्या लोंढा जात होता. पार्किंगला भरपूर जागा होती. 

शहरात इतरत्र सोयी, सुविधा नव्हती. मध्यवर्ती शहरात हे मार्केट असल्याने त्याला प्रतिसाद मिळाला. येथील भाजी मार्केटसुद्धा नेहमी गर्दीने गजबजले असायचे. अलीकडे हे भाजी मार्केटच ओस पडले आहे. सहा हजार चौरस फुटांचा हा एरिया सध्या वापराविना पडून आहे. या भाजी मार्केटवर परिणाम होताच. त्याचा परिणाम इतर मार्केटवरही झाला आहे. 

मार्केटला गलिच्छपणा आला आहे. रंगरंगोटी, साफसफाई केव्हाच झालेली नाही. मार्केटमध्ये गर्दी आहे; पण अस्ताव्यस्तपणा असतो. 

या मार्केटमध्ये गेली की दुर्गंधी येते. त्यातच रेडीरेकनरप्रमाणे भाडेआकारणीचा डाव महापालिकेने टाकल्यापासून व्यापाऱ्यांत अस्वस्थता आहे. 10 ते 20 पटीने झालेली भाडेवाढ अन्यायी आहे. मार्केटमध्ये कोणत्याच सुविधा नाहीत. रेडीरेकनरप्रमाणे जे भाडे समोरच्या दुकानगाळ्यांना आकारले जाते. तेच भाडे आतील कमर्शियल नसलेल्या दुकानदारांनाही भाडे आकारले जाते. 

दृष्टिक्षेपात शिवाजी मार्केट.. 

* एकत्रित बाजाराची संकल्पना 
* प्रशासक कर्नल फेरिस यांनी 1885 ला उभारणी केली 
* 21 हजार चौरस मीटर जागा 
* तत्कालीन प्रशासक द्वारकानाथ कपूर यांनी 
* 1975 ला पुनर्बांधणी केली 
*वास्तुशिल्पी आर. एस. बेरी यांनी आराखडा केला 
* पाच मजली इमारत 
* विविध 250 दुकान गाळे 

स्वच्छतेसाठी प्रयत्न हवेत 
छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये स्वच्छता नाही. महापालिकेचे हे मार्केट आहे. महापालिका शहरभर स्वच्छता करते. विविध ठिकाणी मोहिमा घेते; पण या मार्केटकडे मात्र दुर्लक्ष करते. मार्केटचे हे घाणेरडेपण दूर करायचे असेल, तर गाळेधारकांनीही सहभाग घ्यायला हवा. महापालिका व गाळेधारकांच्या सहभागातून श्रमदान केले तर मार्केट स्वच्छ होईल. 

मार्केट बांधकाम झाल्यापासून गाळ्यांची कोणतीही स्वच्छता, देखभाल, रंगरंगोटी, दुरुस्ती, झाली नसल्याने मार्केटची दुरवस्था झाली आहे, मार्केटना कोंडाळ्याचे स्वरूप आले आहे. 
- बबन महाजन, व्यापारी 

शिवाजी मार्केटमधील भाजीपाला मार्केट रिकामे आहे. सुमारे 6 हजार चौरस फुटांची जागा पडून आहे. परिसरात रस्त्यावर बसणारे भाजी विक्रेते यात आले तर मार्केटमधील व्यापार वाढेल. रहदारीच्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या जागांवर विक्रेते बसतात. 
- सलीम बागवान, भाजीपाला विक्रेता. 

Web Title: shivaji market kolhapur issue