शिवाजी विद्यापीठाचा सांगलीत होणार सब कँपस 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

सांगली - कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा उपपरिसर (सब कॅंपस) सांगली जिल्ह्यात मंजूर केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने विनामोबदला 100 एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विद्यापीठाकडून करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांची भेट घेतली. भविष्यात उपपरिसराचे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, अशा पद्धतीने रचना केली जाणार आहे, असे डॉ. शिंदे यांनी सकाळशी बोलताना सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी आणि जिल्ह्यातील प्राचार्य उपस्थित होते. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठ उपपरिसर स्थापन करण्यात येणार आहे, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. आवश्‍यक जागा सर्व जिल्ह्याला रस्ते मार्गाने जोडणारी असावी आणि पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा, अशा अटी आहेत. ही जागा शासनाच्या मालकीची असावी आणि ती विद्यापीठाकडे विनामोबदला वर्ग करावी लागणार आहे. शक्‍यतो गायरान जमिनींचाच विचार होईल, अशी शक्‍यता आहे. तासगाव किंवा कवठेमहांकाळ तालुक्‍यात राष्ट्रीय महामार्गालगत एवढ्या मोठ्या प्रमाणात गायरानच्या जागा उपलब्ध आहेत. तेथे प्राथमिक टप्प्यात पाहणीचे संकेत मिळत आहेत. 

उपपरिसर म्हणजे काय?
- विद्यापीठाप्रमाणेच सर्व सुविधा 
- शिक्षण, संशोधन आणि प्रवेश प्रक्रिया
- विद्यार्थी, विद्यार्थिंनी वसतिगृह होणार 
- जिल्ह्यातील 70 हून अधिक कॉलेजना याचा फायदा

सोलापूरप्रमाणे स्वतंत्र विद्यापीठ 
शिवाजी विद्यापीठाचा उपपरिसर सोलापूर येथे सुरू करण्यात आला. कालांतराने उपपरिसराचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन झाले. सांगलीत भविष्यात उपपरिसराची रचना करताना स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेसाठीचाच विचार केला जाईल, असे सांगण्यात आले. 

"शिवाजी विद्यापीठाचा उपपरिसर सांगलीत सुरू करताना विद्यापीठात ज्या सुविधा मिळतात त्या सर्व टप्प्याटप्प्याने येथे देण्याची संकल्पना आहे. त्यासाठी रस्त्यांची कनेक्‍टिव्हिटी आणि पाण्याची उपलब्धता असलेली जागा हवी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी सांगली यांना देत आहोत. त्यांनी आज अतिशय सकारात्मक चर्चा केली. हा विषय लवकर पुढे सरकेल, असा विश्‍वास वाटतो.'' 
डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ 

सांगली जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्याच जिल्ह्यात आवश्‍यक शैक्षणिक सोयी सुविधा मिळण्यासाठी उपपरिसर निर्मितीबाबत शिवाजी विद्यापीठाकडून प्रस्ताव येईल. तो शक्‍य तितक्‍या लवकर योग्य जागेची निवड करून राज्य शासनाकडे पाठवला जाईल.'' 
विजयकुमार काळम, जिल्हाधिकारी, सांगली. 

Web Title: shivaji university will have sub campus in sangli